उस्मानाबाद,दि.27(प्रतिनिधी):- भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे सिमेंट नालाबंधारा कामाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गुप्ता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर, उपविभागीय कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णासाहेब देशमुख उपस्थित होते.
हाडोंग्री गावच्या शिवारातील ध्यानकेंद्राच्या परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. येथे तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यामुळे वृक्षांना फायदा होऊन पाणीपातळीत देखील वाढ होणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी बंधाऱ्याचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या.
तत्पूर्वी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी हाडोंग्री परिसरातील शिवमंदिरात जाऊन मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी विविध मान्यवरांसह हाडोंग्री ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
****