वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर सामान्य नागरिकांची ही राहणार करडी नजर
कळंब - कळंब शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर आता सामान्य नागरिकांची करडी नजर राहणार आहे. अनेकवेळा काही लोक सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्किंग करतात यामुळे इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. बेशिस्तपणे वाहन लावल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होणे, लोकांच्या दुकानासमोर किंवा घरासमोर वाहने उभी केल्याने येण्या-जाण्यास सामान्य नागरिकांना त्रास होणे असे प्रकार घडत असतात. या प्रकाराला आळा घालता यावा म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश(भा.पो. से.) यांनी एक अनोखा उपक्रम राबण्याचे आदेश दिले आहेत.
जर अशा प्रकारे बेशिस्त पणे वाहने लावल्याचे प्रकार आढळून आल्यास सामान्य नागरिक आता थेट व्हाट्सएपच्या माध्यमातून ही बाब वाहनांच्या फोटो सहित वाहतूक शाखेच्या निदर्शनास आणून देऊ शकतील. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग कळंब यांच्या तर्फे 8369907421 हा व्हाट्सएप नंबर जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की जर त्यांच्या दुकानासमोर किंवा घरासमोर एखादे वाहन वाहतुकीला अडथळा निर्माण करेल अशा रीतीने बराच वेळ लावण्यात आले असेल तर सदर वाहनाचा फोटो वाहनाचा नंबर स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने घेऊन वरील नंबर वर व्हाट्सएपच्या माध्यमातून पाठवण्यात यावा. पाठवलेल्या फोटोवरून फोटोत दिसणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने दंड आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शहरातील सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून शहरातील वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत ठेवण्यास मदत मिळणार आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश(भा.पो. से.) यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे शहरातील नागरिक कौतुक करत आहेत.