भोगावती नदीच्या सुशोभीकरणासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी , बहुजन योध्दा सामाजिक संघटनेची पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे मागणी

0
भोगावती नदीच्या सुशोभीकरणासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी ,  बहुजन योध्दा सामाजिक संघटनेची पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे मागणी

उस्मानाबाद दि.५ (प्रतिनिधी) - शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदी पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण‌ व सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुबलक प्रमाणात आर्थिक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी बहुजन योध्दा सामाजिक संघटनेच्यावतीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.५ जून रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीच्या खोलीकरण, रूंदीकरण‌ व सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपल्या अधिकारातून अंशतः निधीची व्यवस्था करण्यात यावी. उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आई श्री तुळजाभवानी जिल्हा एवढीच आहे. मात्र जिल्हा सर्वांगीण विकासाच्या बाबतीत फारच मागासलेला असून त्यात शहराची ओळख म्हणजे धारासुर मर्दिनी मातेचे मंदिर व‌ ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह एवढ्या पुरतेच मर्यादित राहिलेली आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागातून भोगावती नदीचे पात्र जात असले तरी आज ते घाणीच्या विळख्यात सापडले आहे. विशेष म्हणजे भोगावती नदीच्या पुलावरून मार्गक्रम करताना जनतेला दुर्गंधीच्या साम्राज्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. तसेच भोगावती नजीकच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तर राजाबाग येथील उस्मानाबाद शहराचे दैवत महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे भोगावती नदीचा परिसर स्वच्छ करण्यात यावा. नदीचे खोलीकरण रूंदीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे. त्याबरोबरच वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी वॉकिंग ट्रॅक, बसण्यासाठी आसन व्यवस्था, लहान मुला- मुलींसाठी खेळण्याची व्यवस्था (घसरगुंडी, पाळणा व वजनकाटा आदी) ची व्यवस्था करण्यात यावी. तसेच नदी पात्रामध्ये असलेल्या जुन्या विहीरींची साफसफाई करुन संरक्षण भिंती करण्यात याव्यात. तर काही किलो मीटर अंतरावर किटवेअर बंधारा बांधण्यात यावा आदी कामांसाठी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुबलक प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात यावी. त्यामुळे उस्मानाबाद शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार असल्याचे नमूद केले आहे. यावर बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे, राजाभाऊ बागल, विधीज्ञ अजित खोत, रवी कोरे, शीला उंबरे, मुकेश नायगावकर, वसुदेव वेदपाठक, विजय गायकवाड, अच्युत माने, आबासाहेब खोत, संदीप जगताप, राजाभाऊ मुंडे, शाम वडणे, कुमार ओव्हाळ आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top