उस्मानाबाद जिल्ह्याने जावयाच्या पाठीमागे ठाम उभा रहायला पाहिजे - आ. चव्हाण
अजित पवार यांच्या समर्थनार्थ मेळाव्यास मोठा प्रतिसाद
उस्मानाबाद दि.१४ ) osmanabad news (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या अजित पवार यांच्या पाठीमागे जास्त आहे. दोन्ही पक्ष एकच असून ते थोडे बाजूला झाले आहेत. त्या तांत्रिक बाबीत मी पडणार नसून ते का बाजूला पडले हे मी सांगण्या इतपत मोठा नाही. परंतू जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हावासियांनी उपमुख्यमंत्री तथा जावयाच्या पाठीमागे ठाम उभा रहायला पाहिजे असे आवाहन औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दि.१४ जुलै रोजी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाच्या समर्थनार्थ उस्मानाबाद शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिराजवळील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या मेळाव्याचे आयोजक तथा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, सुरेश बिराजदार, नंदकुमार गवारे, गोकुळ शिंदे, महेंद्र धुरगुडे, सचिन तावडे, डॉ संदीप तांबारे, प्रा सुशिल शेळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आ चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आमचे दैवत आहेत व कायमच दैवत राहतील. आम्ही कधीही चा पुरोगामी विचार सोडणार नाही. विशेष म्हणजे आम्ही त्यांच्या विचारांचे पाईक असून त्यांचेच विचार माणणारे आहोत. त्यामुळे भाजपचे विचार आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्र पुढे गेला असून त्यांची पुरोगामी विचार त्यांनी आचरणात आणल्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर काही लोकांना पटलेले नसताना सुद्धा त्यांनी नामांतर केले. परंतू त्यांनी विचार त्यांच्या घरी उतरविले. तसेच महिलांना आरक्षण यासह इतर अनेक कामे त्यांनी केलेली असून त्याची किंमत आज आपल्याला कळत असल्याची त्यांनी सांगितले. उस्मानाबादच्या बाबतीत त्यांचे त्यांचे खंदे समर्थक व आपल्या सर्वांचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कामे केली. तर शरद पवार यांनीही जिल्ह्याच्या विकास कामासाठी कुठल्याही बाबतीत निधी कमी पडू दिलेला नाही. तसेच भाऊसाहेब बिराजदार राजाराम पाटील यांच्यासह त्या काळातील बऱ्याच लोकांना जिल्ह्याच्या विकासाबाबत शरद पवार यांनी सहकार्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्याचा विकास करायचा असे सांगून अनेकांनी अनेक इलेक्शन जिंकली. मात्र जिल्ह्यातील विकास कामे केलेली नाहीत. किती कामे प्रलंबित आहेत ? ती मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करावा असे सांगत धाराशिव येथे विकास परिषद घेतली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या विकास परिषदेसाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह संबंधित विभागाच्या मंत्र्यांना देखील आणून ते प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पवार यांची कामाची पद्धत अतिशय वेगळी असल्यामुळेच ते अधिकाऱ्यांना देखील हे फैलावर घेतात. जर पवार यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या शैलीत फैलावर घेतले नसते तर अधिकारी कोणाच्याही बापाला भिले असते. त्यामुळे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी
उपमुख्यमंत्री पवार यांच्या पाठीमागे उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय राजकारण करून भागणार नसून सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा कसा पुढे गेला पाहिजे ? हे सर्वांनी ठरविले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार यांच्यामुळेच मराठवाड्यातील जलसिंचनाचे प्रयत्न सुटले असल्याचा दावा करीत शेतकरी बेरोजगार आदी विकासाचे प्रश्न सोडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तर सुरेश पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार यांना जिल्ह्यात समर्थन नाही असे काही मंडळी म्हणत होती. त्यामुळे हा मेळावा घेतला असून या मेळाव्यास जिल्हाभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बळावरच जिल्ह्यात नंबर एक राष्ट्रवादी पक्ष बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांचा विकास काम करण्याचा धडाका आहे त्यामुळे जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पवार यांना एक मुखी पाठिंबा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेते मंडळींनी द्यावा असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जास्त व कार्यकर्ते कमी असे राजकारण येथील राष्ट्रवादीच्या मंडळींनी केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात वाढली नाही. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व कार्यकर्त्यांच्या जीवावर जिल्ह्या त एक नंबरचा पक्ष करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. काही मंडळी शेतकऱ्यांचे वाटोळे झाले, जिल्ह्याचा विकास झाला नाही असे म्हणतात. मात्र त्यांनी कधी बाजार समिती नगरपंचायत जिल्हा बँक या निवडणुकीमध्ये उभे राहण्याचा प्रयत्न केला नाही असा टोला लगावत त्यांनी जिल्हा ताब्यात घ्यावा व विकास करावा असा टोला राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील गिरगावकर यांचे नाव न घेता लगावला. शरद पवार यांनी माझा फोटो बॅनर वर लावू नये असे सांगितले असताना देखील फोटो कशासाठी लावला ? असे विचारले असता ते म्हणाले की, विठ्ठलाची भक्ती करू नका असे म्हणाले तरी आम्ही करणारच असे नमूद करीत ते म्हणाले की आमचा आश्वासक चेहरा अजित पवार असले तरी दैवत मात्र शरद पवार हेच असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. तसेच अजित पवार यांना विकास कामे करण्यासाठी अडचणी निर्माण येत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे ते आगामी निवडणुकीपर्यंत उपमुख्यमंत्री राहतील व पुढील ५ वर्षे देखील तेच राहतील असा दावाही त्यांनी केला. यावेळी महेंद्र धुरगुडे, सुरेश बिराजदार यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
५० खोक्यांशी आमचा नव्हे नसून शिंदे गटाचा संबंध
पूर्वी शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा राष्ट्रवादीकडून दिल्या गेल्या. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, खोक्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा काहीही संबंध नसून तो फक्त शिंदे गटांच्या आमदारांचा संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलो नसून त्यांच्या साथीनला बसलो असल्याचा खुलासा करीत ते म्हणाले की, शरद पवार हे आमचे दैवत असून त्यांचे विचार आम्हाला सोडता येत नाहीत. परंतू आजची राजकीय परिस्थिती पाहता विकास कामे करण्याची अजित पवार यांच्या मागे जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. परंतू आम्ही भाजपच्या पाठीमागे फरफटत जाणार नसून आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे पवार हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ही बघ सत्य आहे. परंतू भविष्यात अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.