पाटबंधारे प्रकल्पातील अनाधिकृत पाणी उपसा होवू नये याकरिता तालुकास्तरीय महसूल मंडळनिहाय भरारी पथक गठीत
उस्मानाबाद,दि.28( osmanabad news ) : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ देखरेख समितीची व जिल्ह्यातील टँकर व अधिग्रहणाबाबतची स्थिती, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा व उपयुक्त पाणीसाठ्याची सद्यस्थिती याबाबतीत संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने 25 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या बाबत आढावा घेण्यात आला असता संबंधित पाटबंधारे विभागाचे प्रमुख यांनी जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम, लघू असे प्रकल्प, साठवण तलाव, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे यामध्ये 28 ऑगस्ट रोजीपर्यंत सरासरी उपयुक्त पाणीसाठा 10.06 टक्के एवढा आहे व या प्रकल्पातील पाणीसाठा हा पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित केला आहे. या प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पाणी उपसा होत असल्यामुळे प्रकल्पातील उपलब्ध असलेला पाणीसाठा कमी होत आहे. सद्यस्थितीत अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियता यामुळे सन-2023 मध्ये पर्ज्यन्यमान कमी राहण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.
जिल्ह्यात 01 जून ते 28 ऑगस्ट रोजीपर्यंत सरासरीच्या तुलनेत कमी पर्ज्यन्यमान झाले आहे. पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन महिण्याचा कालावधी होत आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला दिसून येत नाही. त्यामुळे या कार्यालयाच्या आदेशान्वये, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पात सद्यस्थितीत उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी पुढील आदेशापर्यंत आरक्षित करण्यात आले आहे.
तसेच संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने, जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पात सद्यस्थितीत उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पातील अनाधिकृत पाणी उपसा होवू नये याकरिता सर्व तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय महसूल मंडळ निहाय भरारी पथक गठीत करण्यात आले आहे. तालुकास्तरीय भरारी पथकात कार्यालयातील एक नायब तहसीलदार, संबधित महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी, संबधित सज्जाचे तलाठी, संबंधित प्रकल्पाचे शाखा अभियंता, महावितरण कंपनीचे संबंधित अभियंता,संबंधित कार्यक्षेत्रातील पोलिस उपनिरिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकास्तरीय महसूल मंडळ निहाय भरारी पथकाकडून त्यांचे कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व पाटबंधारे प्रकल्पास वेळोवेळी भेटी देवून प्रकल्पातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणे, तसेच प्रकल्पातून अवैध पाणी उपसा होत असल्याबाबतची लेखी तक्रार निवेदन, माहिती किंवा अर्ज त्यांना प्राप्त झाल्यास त्याअनुषंगाने संबंधित अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांविरुध्द आवश्यक ती नियमोचित कार्यवाही करण्याबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे. असे जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सांगितले आहे.