बसवराज मंगरुळेंचा दौरा चर्चेत, औसेकर महाराजांसह भाजपच्या जेष्ठांच्या भेटीगाठी !
उस्मानाबाद - भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनी गेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील गावखेड्यांना भेटी देण्याचा सपाटाच लावला आहे. गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत युवकांना उद्योगजकीय सल्ला देत, राजकीय विषयांवर ते चर्चा करत आहेत. त्यामुळे, त्यांच्या आणि भाजपाच्या मनात चाललंय काय असा प्रश्न सर्वांनाच पडत आहेत. त्यातच, त्यांनी औसा तालुक्यातही भाजपच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेतेमंडळींसोबत बैठका घेतल्या आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या गावापर्यंत भेट देत मंगरुळे यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधला आहे. लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने सुरू केली असून मूळ औसा तालुक्यातील मुरूम गावचे रहिवाशी असलेल्या बसवराज मंगरुळे यांच्या गावदौऱ्यामुळे ते जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी त्यांचे बॅनरही लागेल आहेत. नुकतेच त्यांनी औसा तालुक्याचा दौरा केला, यावेळी, औसेकर महाराजांसह भाजपच्या प्रमुख व ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. भागवत धर्म प्रचारक गुरुबाबा औसेकर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ मंडळींसोबत चर्चा केली. त्यामुळे, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचा राजकीय प्रवेश होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. मात्र, अगोदरच दिग्गजांची मादीयाळी असलेल्या जिल्ह्यात ब्रँड बीजेपी म्हणून मंगरुळेंची भर पडली आहे.