शिक्षकांच्या सहाय्याने जिल्ह्यातील बालकांना कुपोषणमुक्त करणार - सीइओ राहुल गुप्ता
उस्मानाबाद-
जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण दीड हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे या बालकांना कुपोषणमुक्त करुन त्यांचे आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आणि शिक्षकांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा कुपोषणमुक्त करणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी (दि.6) दिले.
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य कल्याण बेताळे यांच्या पुढाकाराने सांगवी (काटी) गावातील 10 कुपोषित बालकांना दत्तक घेण्यात आले आहे. या मुलांना पौष्टिक आहार किटचे वाटप जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवदत्त गिरी, सरपंच अमोल पाटील, उपसरपंच रामदास मगर, गटशिक्षणाधिकारी मेहरुन्निसा इनामदार, गटविकास अधिकारी ताकभाते, केंद्रप्रमुख तुकाराम क्षीरसागर, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष मगर, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका स्मिता घोडके, बालविकास प्रकल्प अधिकारी गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यात अतिकुपोषित व कुपोषित बालकांची संख्या 1455 आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सुदृढ बालक, सुदृढ देश यासाठी सर्व बालके शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावीत म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या उपक्रमास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने हातभार लावला असून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संबंधित गावातील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना वर्षभर पौष्टिक आहाराचा पुरवठा करणार आहेत. तसेच पालकांनी देखील आपल्याकडे असलेल्या गहू, ज्वारी, तूरडाळ, मूगडाळ, उडीद डाळ आदीसह इतर पौष्टिक पदार्थांचे पोषण बालकांना देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. त्यामुळे जगामध्ये काय घडामोडी सुरू आहेत याची आपल्या ज्ञानात भर पडते. विशेष म्हणजे वाचनातून अनुभव कथन लिहिण्याचे प्रमाण बंद झाले असून ते सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी दर शनिवारी विद्यार्थ्यांकडून अनुभव कथन लिहून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक कल्याण बेताळे म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी इ-गव्हर्नन्सच्या माध्यमातून शिक्षकांचे केंद्र, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची पायपीट थांबवून अतिरिक्त ताण कमी केला आहे. त्यामुळे आमचे देखील समाजाप्रति उत्तरदायित्त्व असल्यामुळे प्रत्येक गावातील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ केले तर ते जिल्हा परिषदेच्या शाळेत येतील व हेच सुदृढ बालक उद्याचे भविष्य असल्यामुळे गावकर्यांनी देखील या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले. तर दहा कुपोषित बालकांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षक संजय चौधरी, अमोल कविटकर, ज्योतीबा जाधव, शारदा महिंद्रकर, रोहिणी कापसे, तुकाराम वाडकर, अंगणवाडी सेविका पुष्पा मगर व इतरांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जयमाला वडणे यांनी केले. आभार संजय चौधरी यांनी मानले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.