उस्मानाबाद - धाराशिव,दि.29 (osmanabadnews ): एस.पी.शुगर अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या 6 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ क्रीडा व युवक कल्याण,बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा आज 29 सप्टेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन सुरेश पाटील,शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे,सुरेश बिराजदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन सुरेश पाटील म्हणाले की, धाराशिव जिल्हयातील एस.पी.शुगर अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड हा यावर्षीचा एकमेव कारखाना आहे, की जो आमच्या सभासद बांधवांना आणि शेतकरी बांधवांच्या उसाला कमीत कमी भाव 2 हजार 800 रुपये देईल.
मंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, सहकारी कारखाने,प्रायव्हेट कारखाने त्यांचा भाव किती देणार आहेत आणि आपण किती देणार आहोत हे सुद्धा जाहीरपणे सुरेश पाटील यांनी सांगितले.
श्री.पाटील यांनी 2 हजार 800 रूपये हा कमीत कमी भाव जाहीर केला असला तरी त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले की, दुसरा कारखाना जर जास्त भाव देत असेल तर आपण 2800 पेक्षासुद्धा जास्त भाव देऊ हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी जाहीर केले आहे म्हणून त्यांचे मनःपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले.
शासन सहकारी साखर कारखान्याना जी काही मदत लागेल ते मदत करण्याचे काम सुद्धा भविष्यकाळामध्ये होणार आहे.ज्या शेतकऱ्यांचे यावर्षी पीक नुकसान झाले आहे.ज्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाईसुद्धा पीक विम्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.म्हणून शेतकरी बांधवांना कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही.विजेच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय सुद्धा शासन लवकरात लवकर घेत आहे. असेही श्री.बनसोडे यावेळी म्हणाले.