कृषी महाविद्यालय आळणी च्या विद्यार्थ्यांकडून गावसुद येथे शेतकरी मेळाव्याचे यशस्वी आयोजन
उस्मानाबाद -धाराशिव :
कृषी महाविद्यालय आळणी(गडपाटी) धाराशिव येथील सातव्या सत्रामध्ये शिकणाऱ्या कृषीदूत व कृषीकन्याकडून RAWE अंतर्गत मौजे गावसुद तालुका धाराशिव येथे दिनांक 26 सप्टेंबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कृषी मेळाव्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विषय विशेषज्ञ डॉ.भगवान अरबाड व डॉ.भैय्यासाहेब गायकवाड यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री रवींद्र माने यांनी शेतकऱ्यांना सध्याची पीक परिस्थिती, पीक विमा व शेती बद्दलच्या विविध योजना विषयी माहिती सांगितली. तसेच शेतकऱ्यांनी कुठलीही योजना मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल किंवा आपले सरकार यावर ऑनलाईन अर्ज करणे हे अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले. चालू खरीप हंगामा मधील पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकनुकसानीची तक्रार ही 24 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप द्वारे करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या अनियमनामुळे केवळ हंगामी पिकावर विसंबून न राहता संरक्षित पाणी वापर अर्थात शेततळे याचा वापर करून फळ पिकाची लागवड करावी व आपल्या उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण करण्याकडे कल वळवावा असे नमूद केले. सोयाबीन पिकातील किडी व रोग व्यवस्थापन याबद्दल डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांमधील विविध किडींची ओळख त्यांचे काटेकोर नियोजन व व्यवस्थापन त्याचबरोबर जैविक तसेच रासायनिक निविष्ठांचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये भरीव वाढ करावी असे सांगितले. पिकांमधील अन्नद्रव्यांचे महत्त्व व व्यवस्थापन याविषयी बोलताना डॉ.भगवान अरबाड यांनी शेतकऱ्यांना मातीमधील रहास होत जाणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे शेतकऱ्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे तसेच अतिरेकी रासायनिक खतांचा वापर याचा दुष्परिणाम असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी सेंद्रिय निविष्ठांचा हिरवळीचे खते, शेणखत, गांडूळ खत इत्यादींचा वापर करून मातीमधील सेंद्रिय कर्ब हे वाढवणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईलच परंतु त्या व्यतिरिक्त मातीचे आरोग्य सुधारून शाश्वत शेतीचा विकास करणे हे सूकर होईल असे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातव्या सत्रातील विद्यार्थिनी कुमारी कृष्णाई इनामदार व अंकिता मोरे यांनी केले व आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक शेटे डी. एस. , कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका सुमीता पाटील, प्राध्यापिका साबळे एस. एन. प्रा.दळवे एस. ए.,प्रा. सुतार एन. एस., प्रा. साठे एम.पी., डॉ. गांधले ए .जी. तसेच रावे अंतर्गत सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले