शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या भल्यासाठीच भारत राष्ट्र समितीचे सरकार आणावे - धोंडगे
शेतकरी स्नेह मेळावा प्रवेश सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्मानाबाद -धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. मात्र आज देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात आतापर्यंतची सर्व सरकारे सपशेल अपयशी ठरले आहेत. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार त्यांना मिळालेला नाही. मात्र विडी, सिगारेट इतर वस्तू तयार करणाऱ्या उद्योजकांना ते अधिकार बहाल केले असल्याचा घणाघात करीत तेलंगणा राज्यामध्ये भारत राष्ट्र समितीचे सरकार सत्तेवर असून तेथील सर्व समस्या सोडविण्यामध्ये यश आले आहे. विशेष म्हणजे विविध ४१५ योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या भल्यासाठी भारत राष्ट्र समितीचे सरकार आणावे असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रमुख तथा मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी दि.९ ऑक्टोबर रोजी केले.
परंडा तालुक्यातील निजाम (जवळा) येथे आयोजित शेतकरी स्नेह मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी , अँड विश्वजीत शिंदे, रामजीवन बोंदर, रुपेश माळजे, चंद्रकांत भराटे, मुजीब मकानदार, कार्यकर्ते, तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना धोंगडे म्हणाले की, दरवर्षी दुष्काळ अतिवृष्टी अशा विविध संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. सरकारने मदत करावी यासाठी आंदोलने, मोर्चे शेतकरी करतात. मात्र त्यांना काहीच मिळत नाही. एकीकडे दिल्लीच्या वेशीवर देशातील तमाम शेतकरी व शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. यामध्ये ७०० शेतकऱ्यांना हौतात्म्य आले. मात्र शेती प्रधान देशातील शेतकऱ्यांची साधी दखल व नोंद देखील सरकारने घेतली नाही. तर दुसरीकडे तेलंगणात के. चंद्रशेखर राव सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, खरीप व रब्बी हंगामासाठी ५-५ हजार रुपये अनुदान, ५ हजार रुपये भरुन ट्रॅक्टर खरेदी करता येते, माल साठवणुकीसाठी गोदाम, ६८ लाख शेतकऱ्यांच्या विमा उतरविला असून त्याचा हप्ता भरण्यासह विविध विकासात्मक योजना राबविल्या व राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणामध्ये पाणी अडविण्यासारखी नैसर्गिक परिस्थिती नसल्यामुळे २०१४ साली तेथील सिंचन क्षेत्र ८ तर महाराष्ट्राचे १२ टक्के होते. महाराष्ट्रात आता १७ तर तेलंगणा ४८ टक्क्यापर्यंत गेले असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे तेलंगणात शेतकऱ्यांना सशक्त करून राज्य करा म्हणतात. मात्र महाराष्ट्रात गरीब ठेवून राज्य करा म्हणतात असा घणाघात त्यांनी केला. तर पेट्रोल व डिझेल आदींचे भाव वाढले की उठाव केला जातो. शेतकऱ्यांनी एकत्र येत बदलाचे राजकारण करून या सरकारला कायमचे घरी बसवावे, असे आवाहन धोंगडे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा भारत राष्ट्र समिती चे शेतकरी नेते प्रा. मारुती कारकर यांनी तर सूत्रसंचालन अशोक कारकर यांनी व उपस्थितांचे आभार बाबासाहेब सांगडे यांनी मानले. व या कार्यक्रमास भुम, परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील गुरुदास कांबळे, अँड भाऊसाहेब मुंडे, तानाजी कारकर , शिवाजी रोडे , सुरेश राउत, नारायण राऊत, संतोष घोगर, सुखदेव कातुरे, सपंत कारकर , विकास सांगडे, अतुल सांगाडे, पुरुषोत्तम वाघमारे, नवनाथ डांगे, अजिज मुलांनी, किसन घोंगरे, भारत कातुरे, अंतुल कारकर, अमोल गंवारे, विठ्ठल गंवारे, उपस्थित होते.
यावेळी काकासाहेब गवारे, हैदर शेख, रामकृष्ण डोंगळे, महाविर वाघमारे, दयानंद गवारे, बाबासाहेब सांगडे, लक्षण पिसाळ, हाबिराव मुळे, आप्पासाहेब लांडगे, शंकर लांडगे यांच्यासह इतरांनी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास ३५ ते ४० गावातील शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.