डॉ. आंबेडकर साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम संपन्न

0

डॉ. आंबेडकर साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम संपन्न

धाराशिव -उस्मानाबाद  : २० व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार दि.४ रोजी कारखान्याचे संचालक फत्तेसिंह देशमुख, शंकर सुरवसे, व नामदेव पाटील यांचे हस्ते प्रथमतः वजन काट्याचे पुजन करुन त्या नंतर विधीवत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन गव्हाण पुजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक संचालक अॅड. निलेश पाटील यांनी केले. त्यात त्यांनी कारखाना स्थापनेपासुन आजपर्यंतची कारखान्याची वाटचाल, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद (दादा) गोरे यांचे पारदर्शक व्यवहारातुन कारखान्याची निर्माण झालेली विश्वासार्हता व याच जोरावर कारखान्याची पुढील होणारी वाटचाल याचा आढावा उपस्थितांसमोर माडला.


 कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद (दादा) गोरे यांनी सभेस मार्गदर्शन करताना सांगीतले की, ऊस शेती हेच शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असुन कमी पाण्यात व कमी खर्चात शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. आपला परिसर आवर्षण प्रवण असल्याने गेल्या पन्नास वर्षापासुन टंचाई, कमतरता, दुष्काळ तसेच ऊस नाही म्हणुन कारखाना बंद ठेवायचा तर कधी जास्त ऊस झाला म्हणुन पावसाळ्यातही कारखाना चालु ठेवुन ऊस संपायचा नाही हे चक्र चालुच आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात छोटे मोठे गुळपेटी कारखान्यांचे पेव फुटले असुन अशातच कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता यामुळे कितीही ऊस जास्त झाला तरी कारखान्याचे गाळप १०० ते १२० दिवसांच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात ऊस मोठ्या प्रमाणावर झाला अशी परिस्थिती कधीच येणार नाही. कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणेसाठी कारखान्याचे गाळप किमान १६० दिवस चालणे आवश्यक आहे. यापुढे बोलताना श्री. गोरे म्हणाले की, आपल्या भागातील ऊसाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जास्तीची रिकव्हरी मिळत नाही. ऊसाची जास्त रिकव्हरी मिळणेकरीता ऊस उशिरा गाळप करणे योग्य आहे, परिणामी ऊसाला जास्तीचा भाव देणे शक्य होते. परंतु सद्या शेतकरी ऊस दराचा विचार न करता कारखान्याने लवकर ऊस तोडुन घेवुन जाणे अशी मानसिकता निर्माण झाली आहे. आंबेडकर कारखाना हे एक कुटुंब असुन सगळ्यांच्या हिताच्यादृष्टीने निर्णय घेवुन त्यांना आजतागायत न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच सर्वांनी सामुहिक प्रयत्न करुन आजच्या स्पर्धेत साखर कारखाना जिवंत ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. दुष्काळी परिस्थिती असल्याने कमी पाण्यात ऊस पिक जोपासण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत खोडवा व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कारखान्याला सुरुवातीपासुन पाण्याचा प्रश्न असतांना देखील वेगवेगळे मार्ग काढत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत आलेलो आहोत. त्याचाच एक भाग म्हणुन यावर्षी चालू हंगामात 'झिरो वॉटर इनटेक व झिरो डिस्चार्ज' हा प्रयोग राबविणेत येणार असून हंगामात बाहेरील पाणी घेण्याची आवश्यकता नाही तसेच कारखाना प्रोसेसमधुन निघणारे पाणी देखील बाहेर जाणार नसल्याचे नमुद केले. पुढे बोलताना श्री. गोरे म्हणाले की, आंबेडकर कारखान्याला लायसन्स मिळविणेपासुन ते आजपर्यंत बऱ्याच जेष्ठ मंडळी व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यात कै. शिवाजीराव (दादा) साळुंके यांचे आवर्जुन स्मरण केले. तसेच कारखान्याबद्दलची आत्मीयता व दृढ भावनेतुन कारखान्याचे जेष्ठ व तज्ञ संचालक श्री. प्रतापराव देशमुख (बप्पा) हे आजारी असताना देखील दवाखान्यातुन डिस्चार्ज घेवुन कार्यक्रमास आवर्जुन उपस्थितीत राहीले याचाही उल्लेख केला. त्यानंतर कारखान्याचे सभासद, भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक, ऊस तोड/वाहतुक यंत्रणा व कर्मचारी/कामगार यांचे सहकार्यातुन येणारा गाळप हंगाम यशस्वी करण्याचे प्रतिपादन केले. शेवटी कारखान्याचे संचालक अॅड. चित्राव गोरे यांनी कार्यक्रमास उपस्थितीत असलेले सभासद, शेतकरी, संचालक मंडळ, हितचिंतक, पत्रकार, अधिकारी/कर्मचारी व वाहन ठेकेदार यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक श्री आयुबखों पठाण यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सह. साखर कारखाना म., अरविंदनगर, केशेगांव कारखान्याच्या २० व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी गव्हाणीत मोळी टाकताना कारखान्याचे संचालक फत्तेसिंह देशमुख, शंकर सुरवसे, व नामदेव पाटील, प्रतापराव देशमुख व कारखान्याचे  संस्थापक अध्यक्ष अरविंद (दादा) गोरे, संचालक मंडळ सदस्य, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top