सर्वच ५७ मंडळांना मिळणार पीक विम्याचे अग्रीम
उस्मानाबाद -धाराशिव , दि.७, ):- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्हयातील ७ लाख ५७ हजार ८५३ अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविलेला होता. त्यापैकी ५ लक्ष ६० हजार ४६८ शेतकऱ्यांनी ५ लक्ष २३ हजार ४०६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबिन पीक संरक्षित केले होते. योजनेच्या तरतुदीनुसार हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पिकांचे शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येते.
त्याअनुषंगाने हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे. या बाबीअंतर्गत प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळापैकी धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, अंबेजवळगे, येडशी, ढोकी, जागजी, तेर, बेंबळी, केशेगाव, पाडोळी, करजखेडा, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, मंगरुळ, ईटकळ, तामलवाडी, सावरगाव, जळकोट, सलगरा, आरळी बु., उमरगा तालुक्यातील उमरगा, डाळींब, मुळज, मुरुम, बेडगा, बलसुर, लोहारा तालुक्यातील लोहारा, जवेळी, धानुरी, माकणी, कळंब तालुक्यातील शिराढोण, नायगाव, येरमाळा, मस्सा खु., वाशी तालुक्यातील पारगाव, पारा, भूम तालुक्यातील ईट तर परंडा तालुक्यातील परंडा, सोनारी, शेळगाव, अनाळा अशा ४० महसूल मंडळात सलग २१ दिवस पावसात खंड पडल्यामुळे आणि त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकूर, मोहा, गोविंदपूर, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा, भूम तालुक्यातील अंभी, पाथ्रुड, माणकेश्वर, आष्टा, भूम, वालवड तर परंडा तालुक्यातील आसु, जवळा व पाचपिंपळा अशा उर्वरीत १७ महसूल मंडळात कमी पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पावसातील विचलन आदी बाबींचा विचार करुन सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळण्याकरिता अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती. परंतु उर्वरीत १७ महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याच्या बाबतीत विमा कंपनीने काहीं हरकती नोंदविल्या होत्या.
सदर प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी २१ ऑगस्ट, १२ सप्टेंबर व ६ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन विमा कंपनीस अग्रीम देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच हरकतीच्या मुद्यांच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत सविस्तर खुलासा २५ सप्टेंबर २०२३ रोजी पाठवून विमा कंपनीस पाठवून उर्वरीत १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील २५ टक्के आगाऊ रक्कम वितरीत करण्याकरीता विमा कंपनीस आदेशित केले होते. ६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये आयुक्त (कृषि), यांना देखील ४० महसूल मंडळातील शेतकऱ्याबरोबरच उर्वरीत १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील अग्रीम रक्कम देण्याकरीता आयुक्त (कृषी) यांच्या स्तरावरुन विमा कंपनीस आदेशीत करण्याबाबत कळविले होते. तसेच मा.मुख्यमंत्री यांच्या ४ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे ३० ऑक्टोबर २०२३ रोजी विमा कंपनीस जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळातील सर्व सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम दिवाळीपुर्वीच जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कळविले होते. त्यास एचडीएफसी इर्गों या विमा कंपनीने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जिल्ह्यातील ४० महसूल मंडळातील सोयाबीन विमाधारक शेतकऱ्याबरोबरच उर्वरीत १७ महसूल मंडळातील सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांना देखील अग्रीम विमा रक्कम मंजूर करण्यात आला आहे. ४० महसूल मंडळातील ३ लाख ४४ हजार ८३५ शेतकऱ्यांना १६१ कोटी ८० लक्ष रक्कमेच्या वितरणाची कार्यवाही चालू आहे.तर उर्वरित १७ महसुल मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिवाळीपुर्वीच अग्रीम विमा रक्कम वितरीत होणार आहे.असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी कळविले आहे.
******