फक्त पंचनामा व घोषणा नको,शेतकऱ्यांना पेरणी अगोदर मदत हवी! - आमदार कैलास पाटील यांची सचिवाकडे मागणी

0
फक्त पंचनामा व घोषणा नको,शेतकऱ्यांना पेरणी अगोदर मदत हवी! - आमदार कैलास पाटील यांची सचिवाकडे मागणी
 
धाराशिव ता.24: जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान,  दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व  घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करावी, फक्त घोषणा करून शेतकऱ्याची फसवणूक करू नये असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव डॉ.सोनीया सेठी यांची भेट घेऊन जिल्ह्यात झालेल्या परिस्थितीची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
धाराशिव जिल्हयात मागील चार दिवसापासुन अवकाळी पाऊस,गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे, जनावरांचा मृत्यू, राहती घरे, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड  यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळणे आवश्यक आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बि-बियाणे, खते आणण्यास पैसे उपलब्ध नाहीत.फक्त पंचनामे, घोषणा न करता पेरणीपुर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे गरजेचे आहे. धाराशिव जिल्हयात ११ एप्रिलनंतर  २०एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिकाना सोडुन जिरायत पिका खालील ४०२ बाधित शेतकऱ्यांच्या १४१ हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. १३ हजार ६०० प्रमाणे १९ लाख रुपये मिळणे आवश्यक आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन बागायत  पिका खालील २०९ बाधित शेतकऱ्यांच्या ७३.५० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. २७ हजार प्रमाणे रु.१९ लाख , ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिका खालील २०३१ बाधित शेतकऱ्यांच्या १२२०.६० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम. ३६ हजार प्रमाणे रक्कम रु.४३९ लाख असे एकूण २६४२ शेतकऱ्यांना रक्कम ४७८ लाख रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडुन आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर झाला आहे. हा प्रस्ताव तात्काळ मागवुन शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असताना अजूनही प्रस्ताव प्रलंबित आहे. 
धाराशिव जिल्हयात धाराशिव, लोहारा, वाशी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असुन उर्वरीत कळंब, तुळजापुर, उमरगा, भुम, परंडा तालुक्यातील ३३ मंडळांना दुष्काळ सदृष्य म्हणुन नोव्हेंबर मध्ये घोषीत करण्यात आले.  या तालुक्यांतील शेतकऱ्यांना  दुष्काळ बाबत ज्या सवलती देणार ते देणार अशी घोषणा केली होती. स्वत:ला निर्णय वेगवान गतीमान सरकार म्हणवुन घेणाऱ्या घोषणाबाज सरकारने या तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत दुष्काळाची एक रुपयाचीही मदत दिली नाही.  त्यामुळे फक्त घोषणा व पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळाचे अनुदान पेरणीपुर्व जमा करणे आवश्यक होत.जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत न देता फक्त घोषणा व मदत देण्याचा फार्स केला जात आहे. गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व अनुदान जमा करण्याची मागणी आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top