कर्जमाफीची योग्य वेळ व नियम एकदा शेतकऱ्यांना कळू द्या – आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांना सभागृहात थेट विचारणा

0

धाराशिव, ता. ६ जुलै २०२५ : निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देणारे सरकार आता त्या विषयावर बोलताना ‘नियम’ आणि ‘योग्य वेळ’ यांची भाषा करत आहे. मात्र ती योग्य वेळ नेमकी कधी येणार आणि कर्जमाफीचे नियम काय असतात, हे स्पष्टपणे राज्यातील शेतकऱ्यांना सांगावे, अशी ठाम मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली.

विरोधी पक्षाच्या २९३ क्रमांकाच्या प्रस्तावावर बोलताना आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. “नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत राज्यात तब्बल १२६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने याचा गांभीर्याने विचार केला आहे का?” असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत टाकलं.

पाटील पुढे म्हणाले, "कर्जमाफी करणार असे सरकारने निवडणुकीपूर्वी सांगितले होते. पण आता मुख्यमंत्री म्हणतात की, कर्जमाफीसाठी नियम असतात, वेळ लागते. तर मग ती 'योग्य वेळ' कधी येणार? आणि नियम काय आहेत, हे तरी शेतकऱ्यांना स्पष्ट करा. कारण शेतकरी नेहमीच या अशा गोंधळात राहतो."

थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे अनेक शेतकरी मुद्दाम कर्ज थकवतात, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. "आज माझ्या जिल्ह्यातच सुमारे ६० टक्के शेतकरी थकीत आहेत. मग सरकार अजून किती टक्के शेतकरी थकीत होईपर्यंत वाट पाहणार आहे?" असा थेट सवाल करत, कर्जमाफी संदर्भातील सरकारचा पवित्रा म्हणजे दिशाभूल असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून त्यांना प्रत्यक्ष मदतीची गरज आहे, निव्वळ घोषणा किंवा वेळकाढूपणा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणं ठरेल, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top