शेतकऱ्यांनो ! सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ व टोकन पध्दतीचा अवलंब करा - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांचे आवाहन

0
धाराशिव,दि.14(जिमाका) शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांमध्ये बचत करण्यासोबतच सोयाबीनच्या उत्पन्नात 25 ते 30 टक्के वाढ होत असल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांनी  सोयाबीनच्या लागवडीसाठी बीबीएफ व टोकन पध्दतीचा अवलंब करावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले.
          
13 जून रोजी धाराशिव तालुक्यातील मौजे सारोळा येथील शेतकरी अमोल रणदिवे यांच्या शेतात बीज प्रक्रिया करुन टोकन यंत्राने सोयाबीन पिकाच्या 2 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा शुभारंभ डॉ.घोष यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसळकर,कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड,तालुका कृषी अधिकारी संजय जाधव यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
       
डॉ.घोष यांनी स्वत: टोकन यंत्राद्वारे पेरणी केली.जिल्हयातील शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात मागील दोन वर्षापासून या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत असुन शेतकऱ्यांना 17 क्विंटल प्रति एकरपर्यंत उत्पादन मिळाले आहे. यावर्षी सुध्दा शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली खत मिश्रीत बेड पावसापूर्वीच तयार करुन ठेवले.मान्सूनचा पाऊस आल्यावर पेरणीचा शुभारंभ शेतकरी अमोल रणदिवे यांनी केला.

डॉ.घोष यांनी यावेळी श्री.रणदिवे यांचेकडुन राबविलेल्या बाबी व तंत्रज्ञान याची माहिती घेतली.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.माने यांनी बीबीएफ व टोकन पध्दतीने लागवड केल्यास बियाणे व खतांच्या खर्चात 20 ते 25 टक्के बचत होवून उत्पन्नात 25 ते 30 टक्के वाढ होते. मुलस्थानी जलसंधारण साधले जाते. पर्जन्यमान खंडाच्या कालावधीमध्ये पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते.
जास्त पर्जन्यमान झाल्यास अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते. पिकास मुबलक हवा,सुर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते.पिकामध्ये आंतर मशागत करणे,उभ्या पिकात सरीमधुन ट्रक्टर/मनुष्यचलित फवारणी यंत्राद्वारे किटकनाशक फवारणी करणे सोईचे होते.जमिनीच्या धुपीस प्रतिबंध. जमिनीची सच्छिद्रता वाढून जमीन भुसभुशीत होते.
         
तसेच यावर्षी जिल्हयामध्ये 36 हजार 850 हेक्टर क्षेत्रावर रुंद वरंबा सरी पध्दतीने (बीबीएफ) तर 7 हजार 370 हेक्टर क्षेत्रावर टोकन पध्दतीने सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.बीबीएफ व टोकन तंत्रज्ञान पध्दतीने शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात लागवड करावी याकरिता प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  
                   *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)