तुळजापूर व उमरगा विधानसभा लढविण्याचा काँग्रेस कमिटीचा निर्धार , जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव पारित

0


तुळजापूर व उमरगा विधानसभा लढविण्याचा काँग्रेस कमिटीचा निर्धार , जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव पारित 

धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने तुळजापूर व उमरगा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा ठराव एकमताने दि.२३ जुलै रोजी पारित करण्यात आला.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हा काँग्रेस कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील हे होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात उमरगा - लोहारा व तुळजापूर हे दोन मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ले असल्यामुळे या मतदारसंघात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा तिरंगा फडकला पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवावी असा ठराव मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी मांडला. या ठरावास जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद व जिल्हा सरचिटणीस महबूब पटेल यांनी अनुमोदन दिले. तर उमरगा - लोहारा हा विधानसभा काँग्रेसने लढवावा असा ठराव मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी मांडला. या ठरावास उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर व प्रशांत पाटील यांनी अनुमोदन दिले. हे दोन्ही ठराव टाळ्याच्या कडकडाट बहुमताने संमत करण्यात आले. यावेळी खलील सय्यद म्हणाले की, काँग्रेसच्या विभाग व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्कल निहाय कार्यकारणी गठीत करून त्या तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांकडे सादर कराव्यात. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. तर प्रस्ताविकामध्ये जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी करण्यासह बुत कमिट्या स्थापन करणे, बीएलओची नियुक्ती करणे, सोशल इंजिनिअरिंग धोरण अंगीकृत करणे अशा सर्व बाबींवर कार्यकर्त्यांनी काम करावे. त्याबरोबरच केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेविरोधी घेतलेल्या निर्णया विरोधात जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवावा असे आवाहन केले.  तसेच ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष तळागाळात कसा रुजेल यासाठी पक्ष संघटनेवर अधिक भर द्यावा असे आवाहन केले. तर जिल्हा प्रभारी विश्वनाथ चाकवते म्हणाली की, लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी काय योगदान दिले याचा सविस्तर आढावा घेतला. त्याबरोबरच तुळजापूर उमरगा - लोहारा या दोन्ही जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न पराकाष्टा करावी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  या बैठकीस जिल्हा प्रभारी विश्वनाथ चाकवते, जिल्हा उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर, प्रशांत पाटील, विजयकुमार सोनवणे, विलास शाळू, डीसीसी बँकेचे संचालक महेबुब पटेल, बाजार समितीचे संचालक उमेश राजे, नवाज काझी, विनोद वीर, प्रकाश चव्हाण, विभागीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, कपिल सय्यद, आयुब पठाण, मुकुंद (दादा) डोंगरे, नानाभाऊ भोसले, संजय चालुक्य, मधुकर यादव, अनिल लबडे, बाबुराव तवले, प्रभाकर लोंढे, अशोक बनसोडे, शहाजान शिकलकर, मिलिंद गोवर्धन, संजय देशमुख, प्रदेश युवक सरचिटणीस अभिजीत चव्हाण,  तालुकाध्यक्ष ॲड विलास राजोळे (उमरगा), ऍड हनुमंत वाघमोडे (परंडा), राजेश शिंदे (वाशी), रुपेश शेंडगे (भूम), रामचंद्र आलूरे (तुळजापूर), शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे (धाराशिव), रवी ओझा (कळंब), रमेश परदेशी, नवाब काझी (नळदुर्ग), महिला प्रदेश सचिव शीलाताई उंबरे, ज्योतीताई सपाटे, ॲड हेड्डा, समाधान घाटशिळे, अवधूत क्षीरसागर, भूषण देशमुख, अमर तागडे, बाळासाहेब गपाट, ऍड शेषराज माने, बाबा पाटील, प्रभाकर डोंबाळे, वसंत मडके, सत्तार शेख, सलमान शेख, बालाजी माने, काका सोनटक्के, धवलसिंह लावंड, संतोष वडवले, सुधीर गव्हाणे, अकबर शेख, इरफान पठाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top