google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याआधीच नंदगाव गटात राजकीय हालचालींना वेग;शिवसेनेकडून अमोल जाधव यांचे खंदे समर्थक अंकुश रुपनुर मैदानात

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याआधीच नंदगाव गटात राजकीय हालचालींना वेग;शिवसेनेकडून अमोल जाधव यांचे खंदे समर्थक अंकुश रुपनुर मैदानात

0
तुळजापूर:आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या पातळीवर मोर्चेबांधणी करत असताना तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

नंदगाव जिल्हा परिषद गटासाठी यावेळी सर्वसाधारण पुरुष आरक्षण जाहीर झाल्याने या गटातून बोळेगाव येथील सुपुत्र, तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचे खंदे समर्थक असलेले अंकुश अरुण रुपनुर यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी गटातील सर्व गावांमध्ये जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मागील काही वर्षांत अंकुश रुपनुर यांनी नंदगाव जिल्हा परिषद गटामध्ये केलेली सामाजिक, विकासात्मक व लोकहिताची कामे हीच आज त्यांच्या उमेदवारीची मोठी ताकद ठरत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक उपक्रम, तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांचा गटात भक्कम जनसंपर्क निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात त्यांनी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली असून त्याचा थेट फायदा निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा त्यांना असलेला ठाम पाठिंबा, शिवसेनेतील संघटनात्मक अनुभव आणि पक्षाशी असलेली निष्ठा यामुळे अंकुश रुपनुर यांची उमेदवारी अधिक मजबूत मानली जात आहे. शिवसेनेच्या स्थानिक संघटनेमध्ये ते सक्रिय असून पक्षवाढीसाठी त्यांनी नेहमीच योगदान दिले आहे.

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना महायुतीमध्ये लढणार की स्वतंत्रपणे लढणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी नंदगाव जिल्हा परिषद गटावर शिवसेनेने आपला ठाम दावा केल्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंकुश रुपनुर यांना रिंगणात उतरवल्याने विरोधकांची चांगलीच धावपळ सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिवसेना पक्षाची ताकद, धनुष्यबाण चिन्हाची ओळख, स्वतःचा मजबूत जनसंपर्क, तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा पाठिंबा आणि गेल्या काळातील विकासकामांचा लेखाजोखा या सर्व बाबींच्या जोरावर अंकुश रुपनुर हे नंदगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट होत आहे. आता या संदर्भात पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे नंदगाव गटासह संपूर्ण तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदगाव गटात शिवसेनेची हालचाल वाढल्याने येणाऱ्या काळात येथील राजकीय समीकरणे अधिकच तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top