मुंबई – 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात देशातील बॅंकांच्या सर्व शाखातील कामकाज चालू राहील. यासंदर्भातील कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे सचिव देबशिष पांडा त्यांनी ट्विटरवर सांगितले की,सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे आगामी काळात बॅंकांच्या शाखातील कामकाजही थांबविले जाणार असल्याच्या अफवा समाज माध्यमांमध्ये पसरल्या आहेत. मात्र बॅंकिंग सेवा अत्यावश्यक असल्यामुळे शाखातील कामकाज सुरळीत चालू राहील.
मात्र कामकाजाचा कालावधी काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहक शाखांतून व्यवहार करण्याऐवजी एटीएम आणि नेट बॅंकिंगच्या माध्यमातून व्यवहार करतील. सध्याच्या परिस्थितीतून देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि रिर्झव्ह बॅंक प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये देशातील बॅंकांचा महत्त्वाचा वाटा राहणार आहे.
असे असतानाच करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शाखांचे कामकाज थांबले जाणार असल्याच्या अफवा पसरल्या जात आहेत. या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे पांडा यांनी नमूद केले आहे. रिर्झव्ह बॅंकेने सकाळीच रेपोदरात मोठी कपात करून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाय योजना जाहीर केल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये बॅंकांची गरज जास्तच आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना स्वतःची काळजी घेऊन काम करण्यास सांगितले आहे. मात्र ग्राहकांनी गरज नसताना बॅंक शाखात येऊ नये, असे ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे