युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या आंध्र बॅंक आणि कॉर्पोरेशन बॅंकेच्या आगामी विलीनीकरणानंतर ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक बनेल. हा करार झाल्यानंतर नव्याने तयार झालेली बॅंक म्हणजे , 76 हजारकर्मचारी, 9600 पेक्षा अधिक शाखा आणि 13500 पेक्षा जास्त एटीएम असलेले देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बॅंकिंग नेटवर्क असेल. या विलीनीकरणामागे देशातील एक मोठी आणि कार्यक्षम बॅंक तयार करून बॅंकिंग क्षेत्राला जोखीम व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे.
युनियन बॅंक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक वेंकटेश मुचल यांनी सांगितले, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच ग्राहकांना अधिक चांगली उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने या तीन बॅंकांची एकत्रिकरणासाठी निवड केली आहे. या बॅंकांच्या विस्तृत जाळ्याद्वारे आणि विविध उत्पादने, आधुनिक तंत्रज्ञान व सेवांच्या माध्यामातून ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव आणि सुधारित भांडवल क्षमताही मिळेल. कॉर्पोरेशन बॅंक आणि आंध्र बॅंकेत एकसारखी कोअर बॅंकिंग सिस्टीम असल्याने युनियन बॅंक ऑफ इंडियामधील आयटी विभागा समोरील एकत्रिकरणाचे आव्हानही सोपे झाले आहे.
‘भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाला अनुसरून होत असलेल्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तरुण आणि महत्त्वाकांक्षी भारतीयांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, डेबिट आणि क्रेडिट कार्डासह अगदी नवे प्रीपेड फोरेक्स कार्ड आम्ही लवकरच सुरु करणार आहोत. तसेच ज्यादा भांडवल, बॅंकेच्या अनेक शाखांची उपलब्धता, ज्यादा शुल्क न घेता इंट्रा-बॅंक व्यवहार सुविधा असलेले विस्तीर्ण एटीएम नेटवर्क ग्राहकांसाठी उपलब्ध असेल, असे मुचल यांनी नमूद केले.