रक्तदानासारखे दुसरे कुठलेही दान मोठे होऊच शकत नाही - निंबाळकर
तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ यांच्यामुळेच प्रयोगशाळा उभारली
उस्मानाबाद दि.११ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. उस्मानाबाद येथेही रक्तदान शिबीर घेण्यात येत असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. कारण रक्तदान सारखा दुसरा कोणताही कार्यक्रम मोठा व दान देखील मोठे होऊच शकत नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी केले.
खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शरदचंद्रजी पवार फाऊंडेशनच्यावतीने दि.११ डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथील सावरकर चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयाज शेख, कार्याध्यक्ष सचिन तावडे, उपाध्यक्ष मनोज मुदगल, समर्थ सिटीचे संस्थापक सचिन शिंदे, नगरसेवक अभिजित काकडे, बाबा मुजावर, संदीप साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुरज मोटे, शरदचंद्रजी पवार फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर घोडके, उपाध्यक्ष रणधीर इंगळे, केतन पुरी, शहानवाज सय्यद व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी अश्विनी गोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय निंबाळकर म्हणाले की, जिल्ह्यात विविध आजारांच्या विषाणूंची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी लातूर किंवा सोलापूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत होते. तो रिपोर्ट येण्यासाठी चार-पाच दिवसांचा कालावधी लागत होता.
अशीच परिस्थिती कोरोनाच्या काळात देखील उद्भवल्यामुळे स्वॅब नमुने तपासणीसाठी औरंगाबाद, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत होते. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे प्रयोगशाळा उभारणीसाठी मागणी केली होती. मागणीचा पाठपुरावा सुरू असतानाच मुधोळ यांनी धाडसी निर्णय घेतल्यामुळेच उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरात कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळा उभा राहू शकली.
तसेच प्रयोगशाळेत एक कोटी रुपयांच्या मशनरी शासनाच्या तिजोरीतून एक रुपयाही खर्च न करता बसविल्या गेल्या हे दुर्मिळ काम केवळ आणि केवळ मुधोळ यांच्यामुळेच झाल्याचे त्यांनी प्रांजळपणाने सांगितले. विशेष म्हणजे कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला अशा व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या पोटच्या मुलांनी नकार दिला. मात्र जिल्हा शासकीय रुग्णालय व नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजसेवा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम करुन ती जबाबदारी देखील त्यांनी हिमतीने व्यवस्थित पार पाडली आहे व पाडीत आहेत. त्याबद्दल त्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे सांगत त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच या कर्मचाऱ्यांच्या नशिबी नियतीने समाजसेवा लिहिली गेली असावी असे सांगून ते म्हणाले की, कोरोनाचा धोका अद्यापही कमी झाला नसून यापुढेही आणखी तीन महिने स्वतःची सर्व काळजी घेऊन शारीरिक रोग प्रतिकार शक्ती वाढवून व सावधगिरीने असेच काम करावे व तुमच्या हातून समाजसेवा सुरू रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांचा विमा अद्यापपर्यंत उतरविला गेला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा लवकरच विमा उतरवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप इंगळे यांनी तर उपस्थितांचे आभार शेखर घोडके यांनी मानले.
यावेळी कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी त्यांना प्रोटीनयुक्त कीट देण्यात आले. कोरोना योद्ध्यामध्ये रामा अडेल गंदेवाड (स्मशान, जोगी), गोरे विलास सावळाराम
(न.प लिपिक), डुकरे दिगंबर बाबुराव (वाहन चालक), जानराव अजिंक्य राहुल, शेख गाजीमिया फरीद, कस्तुर योगा गायकवाड, चौगुले बालाजी तुकाराम, चंद्रकांत सतीश धावणे, पांडागळे सुधाकर नवनाथ (सर्व मदतनीस), अंकुश रामहरी पाटील, इस्माईल अब्दुलहक शेख (मदतनीस, शासकीय रुग्णालय), किरण युवराज देडे
(१०८,ॲम्बुलन्स चालक), शेख जलील हैदर, अरबाज पठाण व आदित्य जानराव या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.