अर्नब गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करा - उस्मानाबाद काँग्रेस
उस्मानाबाद दि 22 :- रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्नब गोस्वामी आणि B.A.R.C. चे C.E.O. पार्थोदास गुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सी.आर.पी.एफ. जवानांवर झालेल्या हल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटवर भारताने हवाई हल्ला केला . या कारवाईची माहिती अर्नब गोस्वामींना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे . देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली ? देशाच्या संरक्षण विषयक महत्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली ? ही माहिती गोस्वामीला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली ? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का ? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की , ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकार मधील मोठा व्यक्ती आहे . त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे . अर्नब गोस्वामी याचे हे कृत्य Official Secrets Act - १९२३ , Sec.५ नुसार कार्यालयीन गोपनियतेचा भंग करणारे आहेतच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. असे उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी निवेदनात नमूद केले आहे
पत्रकार अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टी.व्ही.ने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दुरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे . रिपब्लिक टी.व्ही . ने दुरदर्शनला पैसे न देता त्यांच्या फ्रिक्वन्शी वापरने हा गुन्हा आहे . टी.आर.पी. घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे . दुरदर्शनने माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धन राठोड यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणातून दिसून येत आहे . याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला पाठींबा आहे . जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्नब गोस्वामी विरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही असा प्रश्न काँग्रेस कमिटीने या निवेदनात उपस्थित केला आहे.
व्हॉट्सअप चॅट वरून अर्नब गोस्वामी यांचे पंतप्रधान , गृहमंत्री यांच्यासह सरकार मधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी त्याला नियमाच्या पलीकडे जावून व्यवसायीक मदत केली असल्याचे स्पष्ट आहे . त्या सोबतच पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे तो निवडणुक जिकेल असा उल्लेख ही या चॅट मध्ये आहे . त्यामुळे भाजपने निवडणुक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलीदानाचा वापर केला का ? याचे उत्तर ही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्नब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य , देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे निवेदनातील सर्व गंभीर बाबींची चौकशी करून अर्नब गोस्वामी यांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरजभैय्या पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, संघटक राजेंद्र शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, प्रशांत पाटील, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, मा.नगरसेवक दर्शन कोळगे, युवक प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, मूहिब शेख, खुद्दुस सिद्दीकी, हरिभाऊ शेळके, मिलिंद गोवर्धन, विश्वजित शिंदे, राहुल लोखंडे, अभिजित देडे, प्रसन्न कथले कृष्णा तवले, सचिन धाकतोडे, समाधान घाटशिळे, सुरेंद्र पाटील, मेहराज शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.