शिधापत्रिका तपासणी मोहिमेस सहकार्य करावे : कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद,दि.09क्ष(जिमाका) :- राज्य शासनाच्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश, 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता खास शोध मोहिम राबविणे आवश्यक आहे. या मोहिमेत शिधापत्रिका धारकांनी सहकार्य करावे, अन्यथा शिधापत्रिका रद्द होऊन अन्न-धान्य मिळणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यरत बी.पी.एल. ( BPL ) अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहिम 28 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्या नुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांची शिधापत्रिका ज्या रास्त भाव दुकानाशी जोडण्यात आलेले आहे, त्या दुकानातून शासकीय कर्मचारी / तलाठी यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म वाटप करण्यात येणार आहे.
शिधापत्रिकाधारकांनी फॉर्म भरुन देताना फॉर्म सोबत ते त्या भागात राहात असल्याचा पुरावा द्यावा, पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एल.पी.जी. जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन/मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन / इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रती देता येतील. दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जूना नसावा.
शिधापत्रिकाधारकांनी फॉर्म भरुन दिल्या नंतर संबंधीताकडून दिनांकीत स्वाक्षरीची पोच घेण्यात यावी तसेच जे शिधापत्रिकाधारक या मोहिमेत पुराव्यासह फॉर्म भरुन देणार नाहीत त्यांची शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहेत व त्यांचे अन्न धान्य देण्याचे थांबविण्यात येणार असल्यामुळे अपात्र शिधापत्रिका मोहिमेत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिकेचा तपासणी नमुना भरुन पुराव्यासह देण्यात यावा, असेही आवाहन श्री. दिवेगावकर यांनी केले आहे.