मलकापूर येथे समुपदेशनाद्वारे बालविवाह थांबवण्यात यश
उस्मानाबाद,दि.09(जिमाका):- परंडा तालुक्यातील मलकापूर येथे छुप्या पध्दतीने बालविवाह करण्यात येणार असल्याची माहिती कळताच हा बालविवाह समुपदेशन करुन ग्राम बाल संरक्षण समितीच्या प्रयत्नाने थांबविण्यात आला.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्या आदेशानुसार जिल्हा महिला व बालविवाह अधिकारी बी.एच. निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परंड्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी एन.डी.गायके व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे यांच्या प्रयत्नाने ही कार्यवाही करण्यात आली.
हा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विभावरी खुने व पोलिस निरिक्षक यांच्या प्रयत्नाने नियोजित बाल विवाह दोन्ही वधु व वर यांना समुपदेशन करुन तसेच त्यांच्याकडून जबाब घेवून थांबविण्यात आला. यात मलकापूरचे ग्रामसेवक जी.सिंगे, मुगावचे ग्रामसेवक जी.कांबळे, अंबी पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड, मुगावच्या अंगणवाडी कार्यकर्त्या श्रीमती सुजाता राऊत,पूजा भागडे, राजेंद्र गरदाडे, प्रकाश शिंदे, नागरिक तसेच मलकापूरच्या अंगणवाडी कार्यकर्त्या संजिवनी येवळे, मलकापूरच्या आशा कार्यकर्त्या ज्योती गरड, मलकापूरचे तलाठी के.ए.शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नाने व ग्राम बाल संरक्षण समितीच्या सतर्कतेमुळे संबंधीत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला समुपदेशन करुन पंचनामा करुन सदर बालविवाह थांबवण्यात आला.