तुळजापूर - छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार भाविकांसाठी सुरू पुजारी, नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा !
तुळजापूर :- कोरोना संसर्ग प्रादुर्भाव कमी झाल्याने श्री तुळजाभवानी मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार भाविकांसाठी सुरू करण्याबाबत तसेच दर्शन पासची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार तुळजापूर यांना आमदार राणा पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने आज छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार खुले करण्यात आले.
ओळखपत्र दाखवून पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. येत्या दोन दिवसांमध्ये भाविकांना देखील येथून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती या वेळी देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार बंद असल्याने आराधवाडी भागात राहणाऱ्या पुजारी, नागरिक, व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. आता महाद्वार उघडल्याने परिसरातील पुजारी, नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याठिकाणी भाविकांसाठी दर्शन पासची सुविधा उपलब्ध असेल.