Osmanabad येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काय झाले? -आ. राणाजगजितसिंह पाटील
अर्थसंकल्पात तरतूद करा परिवहन मंत्र्यांना मागणी.
Osmanabad :-
अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊन देखील उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने जिल्ह्यातील जनता शासनाप्रती नाराजी व्यक्त करत असून याबाबत परिवहन मंत्री म्हणून वैयक्तिक लक्ष द्यावे व यासाठी दि.०८.०३.२०२१ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून हे काम शासन निधीतून हाती घेण्यात यावे अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी ना. अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.
परिवहन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील बसस्थानक, आगार यांची व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुनर्बांधणी करण्यासाठी रु.३० कोटी तसेच कर्जत येथे नवीन आगार उभारण्यासाठी आणि जामखेड येथे बसस्थानकांची पुनर्बांधणी करण्यासाठी रु.१४.८५ कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली आहे, याबद्दल राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी परिवहन मंत्र्यांचे अभिनंदन केले. परंतु उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या असलेल्या व अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊन देखील प्रत्यक्ष कामास सुरुवात न झालेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी निधीच्या मागणीचा उल्लेख कुठेही दिसला नाही याची खंत व्यक्त केली.
उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून शिक्षण, बाजारपेठ व आरोग्य सुविधा इत्यादी कारणास्तव अनेक नागरिक येथे ये-जा करत असतात. शहरात सध्या असलेल्या बसस्थानकाची दुरावस्था झालेली असून पुरेशा सोई-सुविधा उपलब्ध नाहीत. येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची लक्षणीय संख्या लक्षात घेता सदर बसस्थानक अत्यंत छोटे व अपुरे पडत असल्याने या बसस्थानकाच्या जागी नवीन भव्य बसस्थानक उभे करण्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित असल्याचेही आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी म्हटले आहे.
आघाडी सरकारने राज्यातील महत्त्वाच्या शहरात असलेल्या बस डेपोची जागा व्यापारी संकुल योजनेच्या मध्यमातून विकसित करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यात उस्मानाबाद, बीड, येवला, म्हसवड, रत्नागिरी, रहिमतपूर आदी ठिकाणच्या बसस्थानकांचा समावेश करण्यात आला होता. ‘बीओटी’ तत्वावर सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेमुळे तरी उस्मानाबाद बस डेपोसह बस स्थानकाचे आधुनिकीकरण होईल, असे जिल्ह्यातील जनतेस वाटत होते. यानुसार दि.२४.०८.२०१४ रोजी उस्मानाबाद बसस्थानकाचे भूमिपूजनही झाले होते. तद्नंतर दि.१४.०३.२०१६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे रु.९६.०० कोटी निधीचे वाटप शासनाने करून रत्नागिरी आणि म्हसवड सह राज्यातील विविध ४१ ठिकाणच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली होती. तसेच त्यासाठी विकासकांची निवड करून त्यांना स्वीकारपत्र ही देण्यात आलेली होती. यावरून शासनाला वरील बसस्थानकांची कामे शासन निधीतून करणे अभिप्रेत असल्याने महामंडळाने दि.१८.०५.२०१६ रोजी सभा घेऊन त्यामध्ये उपरोक्त व्यापारी संकुल योजनेच्या माद्यमातून करण्यात आलेली निवड रद्द करून त्याऐवजी मंजूर बसस्थानकांची कामे शासन निधीतून / महामंडळाच्या निधीतून हाती घेण्याचे प्रस्तावित करण्याचा ठराव घेतला असल्याचेही आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
यानंतर दि.०९.०८.२०१९ रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे उपकामासह पुनर्बांधणी करण्याकारीता प्रशासकीय मान्यता देवून रु.१०.१५ कोटीच्या निधीस शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार दि.२३.०८.२०१९ रोजी ई-निविदा प्रकाशित करण्यात आल्या व दि. १३.०९.२०१९ रोजी निविदा उघडण्यात आली. दरम्यान दि.३१.०८.२०१९ रोजी वा त्या सुमारास तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते सदर कामाचे पुन्हा एकदा उद्घाटन देखील करण्यात आले होते, तरीही या कामास सुरुवात झालेली नसल्याचे यावेळी आ. पाटील यांनी परिवहन मंत्र्यांना आवर्जून सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ, मुंबई कार्यालयात दि.०६.१०.२०२० रोजी पुन्हा उस्मानाबाद बसस्थानकाचे बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर आधुनिकीकरण करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आला होता. परंतु यातही पुढे काहीच न झाल्यामुळे व अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊन देखील प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्याने जिल्ह्यातील जनता शासनाप्रती नाराजी व्यक्त करत आहे, याबाबत परिवहन मंत्री ना.अॅड. अनिल परब यांनी वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी पत्राद्वारे व्यक्त केले. तसेच उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यासाठी दि.०८.०३.२०२१ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून हे काम शासन निधीतून हाती घेण्यात यावे अशी मागणी यावेळी केली आहे.
Osmanabad येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काय झाले? -आ. राणाजगजितसिंह पाटील
मार्च ०४, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा