शिक्षण शुल्का बाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन
कळंब - 'एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी' या उपक्रमात अंतर्गत दि.२७ मे रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कळंबच्या वतीने उपविभागीय अधिकारी कळंब यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षण शुल्कात ( Tuition Fee) सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विदयार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये,ज्या सुविधा विदयार्थी वापरत नसतानाही शिक्षण संस्था त्याचे शुल्क आकारत असेल तर अश्या संस्थांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल,शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्क निच्छितीची पुन्हा प्रक्रिया करून नवीन शुल्क निच्छित करावे, तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थाना शुल्क आकारण्याचा हक्क नाही असा आदेश काढावा,केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सर्व बँकांना 0% व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत,नर्सरी ते १० वी चे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थानी शैक्षणिक साहित्य (पुस्तके, वह्या इ.) शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करु नये.तसेच बोर्डाने (CBSE,ICSE,STATE) जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत. दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्या शिक्षण संस्थेची तक्रार संबधित बोर्डाकडे करण्यात येईल,ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षे पासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला शाळा- महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये.आदी मागण्या करण्यात आल्या आहेत .
या निवेदनावर तालुकाध्यक्ष भिमा हगारे,कार्याध्यक्ष अतुल धुमाळ, उपाध्यक्ष ओंकार तांदळे,शहर उपाध्यक्ष अजय जाधव,प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके,आफताब तांबोळी,किसना शिंदे,मुश्रीफ डांगे, सौरभ मुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.