घरगुती सोयाबीन बियाणे वापर व उत्पादन - यू.आर. घाटगे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

0


    उस्मानाबाद  जिल्हयाचे खरीप 2020 मधील पेरणी क्षेत्र सहा लाख दोन हजार हेक्टर होते. त्यापैकी सोयाबीन या पीकाचे क्षेत्र तीन लाख 75 हजार हेक्टर होते. म्हणजेच सोयाबीन हे आपल्या जिल्हयाचे खरीपातील मुख्य पीक आहे. पेरणीच्या 62 टक्के क्षेत्र हे सोयाबीन पीकाखालील आहे. सोयाबीनला मागील वर्षी मिळालेले चांगले भाव,आलेली उत्पादकता यामुळे चालू वर्षी सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ संभवत आहे.

        उस्मानाबाद जिल्हयाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे म्हणजेच पर्यायाने ती सोयाबीन पिकांवर अवलंबून आहे, असे म्हणल्यास वावगे ठरु नये. तेव्हा या पिकांची उत्पादकता वाढवणे, त्याच बरोबर उत्पादन खर्च कमी करुन शेतक-यांचे  उत्पन्न वाढविणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे.उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित जातींचा अवलंब,BBF तंत्रज्ञानाचा वापर,संतुलित खतांचा वापर आणि योग्य पध्दतीने पीक संरक्षण इत्यादी बाबींचा समावेश आहे. यातील केवळ सुधारित जातींचा अवलंब या बाबींवर चर्चा करणार आहोत. कारण बियाणे हा उत्पादन वाढीतील जसा महत्तवाचा घटक आहे तसाच तो उत्पादन खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा घटक आहे.तेव्हा या दोन्ही दृष्टी कोणातून विचार करावा लागणार आहे.

       उस्मानाबाद जिल्हयाकरता तीन लाख 75 हजार हे.क्षेत्रासाठी 75 किलो.प्रती हेक्टर या दराप्रमाणे दोन लाख 81 हजार 250 क्विंटल बियाण्याची गरज आहे. बाजारातील आजचा सरासरी दर 100 रु. प्रती किलो गृहीत धरल्यास जिल्हयासाठी लागणा-या बियाण्याची रक्कम 281.25 कोटी रुपये होईल. सोयाबीन पीक स्वयंपरागीत असल्याने घरच्या घरी बियाणे राखून ठेवणे शक्य आहे. तसेच अनेक शेतकरी घरचे बियाणे राखून त्याची पेरणी करतात आणि त्याचे परिणाम सुध्दा चांगले दिसून आले आहेत. खरीप 2021 मध्ये मात्र काही बाबी लक्षात घेऊन घरचे घरी बियाणे राखून ठेवण्याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे.खरीप 2020 मध्ये घरचे बियाणे राखून ठेवण्यासाठी कृषी विभागाने मोठया प्रमाणात प्रचार प्रसिध्दी हंगामाच्या सुरुवातीपासून केली. परंतु काढणीच्या वेळेस झालेल्या पावसाने त्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.त्यामुळे ज्या शेतक-यांचे सोयाबीन भिजले नाही. मग ते कोणत्याही वाणाचे असो, ते राखून ठेवण्याचा सल्ला पुढे उदभवणा-या बियाणे तुटवडयाचा प्रश्न लक्षात घेता देण्यात आला. जे एस 335 या वाणाचा पेरा 60 टक्के क्षेत्रावर होत असल्याने परिणामी राखून ठेवलेल्या बियाण्यात ही याच वाणाचा मोठा वाटा होता.

      आज रोजी विद्यापीठांनी संशोधित केलेले अनेक वाण जे एस 335 या वाणापेक्षा सरस असल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रामुख्याने MAUS 71, MAUS 162,MAUS 612, MAUS 158, DS 228, KDS 726, KDS 753 या वाणांचा उल्लेख करावा लागेल. यातील काही वाणांचे एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन शेतक-यांना मिळाले आहे. विशेषत: कोरडवाहू परस्थितीमध्ये MAUS 158 आणि DS 228 या वाणांची उत्पादकता चांगली दिसून आलेली आहे. त्यामुळे शेतक-यांनी या वाणांचे किंवा ज्या वाणांची उत्पादकता शेतक-यांना चांगली मिळाली आहे, त्या वाणाचे बियाणे राखून ठेवावे. यातील काही वाण जसे KDS 726 आणि KDS 753 हे कृषी सेवा केंद्रातून मोठया प्रमाणात मिळण्यासाठी 3-4 वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतक-यांना पसंतीत उतरलेल्या या सारख्या वाणांसाठी घरचे बियाणे राखून ठेवणे, हा या वाणाखालील क्षेत्र वाढविण्याचा एकमात्र पर्याय आहे.

     घरच्या घरी बियाणे राखून ठेवत असतांना काय काळजी घ्यावी, याबाबत यापूर्वी कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आलेली आहे. त्याचा उल्लेख या ठिकाणी करणे योग्य वाटत असल्याने पुन्हा एकदा करत आहे.बियाण्यासाठी राखून ठेवलेल्या प्लॉटमधील भेसळीची झाडे काढून टाकावित. त्यामध्ये सर्वसाधारण  पिकांपेक्षा कमी किंवा जास्त उंचीची, वेगळया वेगळया रंगाची फुले व शेंगा असलेली तसेच रोगट झाडे काढूण टाकावित. कीड व रोगांचा योग्य बंदोबस्त करावा. शेंगा भरत असताना अंतर प्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी, जेणे करुन साठवणुकीच्या काळात बुरशीची वाढ होणार नाही.प्लॉटच्या चारही बाजूच्या शेतात त्याच वाणाचे सोयाबीन बियाणे असेल तर ठीक अन्यथा ज्या बाजूस त्या वाणाचे बियाणे नाही त्या बाजूच्या बांधापासून तीन मीटर आतापर्यंतची झाडे बियाण्यासाठी काढणीच्या वेळी घेऊ नयेत.

     कापणी नंतर किंवा काढणी नंतर पावसात भिजलेले सोयाबीन बियाण्यांसाठी राखून ठेवू नये. कापणी नंतर सोयाबीनच्या शेंगावर बुरशी येईल अशा पध्दतीने साठवणूक करु नये. सर्वसाधारणपणे पध्दतीने मळणी करत असताना मळणी यंत्राची गती ही 700 ते 750 RPM असते, बियाण्यांसाठी राखून ठेवलेल्या पीकाची मळणी करत असताना मळणी यंत्राची गती 300 ते 350 RPM ठेवावी जेणेकरुन बियाण्यांची आदळ आपट कमी प्रमाणात होईल. साठवणूक करण्यापूर्वी बियाण्यातील आर्द्रता 9-12 टक्के राहील याची काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना बॅग कोंदट जागेत न ठेवता हवेशीर जागेत करावी. जेणेकरुन बुरशीची वाढ होणार नाही. एकावर एक जास्तीत जास्त तीन बॅग साठवून ठेवण्यात याव्यात किंवा बॅग भिंतीला लागून उभी ठेवण्यात यावी. पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10 ते 15 से.मी. उंचीवर लाकडी फळयांवर लावावी. या बाबींची काळजी घेतल्यास आपल्याला मिळणारे बियाणे दर्जेदार असेल याद वाद नाही.

    बियाण्यांवरील खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी बियाणे उत्पादनाबरोबरच एकरी किती बियाण्यांचा वापर करावयाचा या बाबीचा सुध्दा विचार करावा लागणार आहे. सध्या मोठया प्रमाणावर शेतकरी एकरी 30 किलो बियाण्यांचा वापर करतात परंतु BBF द्वारे पेरणी केल्यास एकरी 20 ते 22 किलो बियाण्याचा वापर करुन सुध्दा उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ दिसून आली आहे तसेच टोकण पध्दतीने लागवड केल्यास केवळ 10 ते 12 किलो बियाण्याचा वापर करुन उत्पादकता दीडपट ते दुप्पट मिळत असल्याचे दिसून आले आहे.

        तेव्हा शेतक-यांनी सुधारित अधिक उत्पादन देण्या-या वाणांचेच घरच्या घरी बियाणे उत्पादित करावे,तसेच पुढील हंगामात BBF आणि टोकन पध्दतीचा अवलंब करुन बियाण्यांवरील खर्च कमी करुन उत्पादन आणि पर्यायाने उत्पन्नात वाढ करावी . - आर. घाटगे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top