उस्मानाबाद, ( Osmanabad ) दि.19 (प्रतिनिधी ) :- जिल्हयात खरीपाच्या सुरुवातीला पावसाचा खंड पडल्याने सर्व पिकांवर गोगलगाय व पैसा (मिलीपीड) या किडींचा उपद्रव वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे शेताचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.त्यावर कृषी विभागाने सांगितलेल्या उपाय योजना कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कीडी निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळीच पिकांना नुकसान करतात.दिवसा त्या जमिनीमध्ये किंवा बांधावर लपून राहतात.या कीडी रोपावस्थेत पानासहित संपूर्ण रोप खाऊन टाकते.त्यामुळे मोठयाप्रमाणावर नुकसान होते.तसेच बांधावरील व शेतातील तणांवरसुध्दा ही कीड आढळून आली आहे.या किडींच्या व्यवस्थापनासाठी कोळपणी करावी आणि शेत तण विरहित ठेवावे.या कीडी रात्री जास्त सक्रिय असल्याकारणाने शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत किंवा गवताच्या ढीगाच्या ऐवजीबारदाने(सुतळी पोते) 10 लि. पाण्यात एक किलो गुळ टाकून भिजवून पसरवून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली किंवा बारदाण्याखाली जमा झालेल्या कीडी गोळा करून मिठाच्या द्रावणात किंवा कपडे धुण्याच्या सोडयाच्या द्रावणात किंवा कीटकनाशकांच्या द्रावणात टाकून माराव्यात. चांगला पाऊस पडल्यास पैसा (मिलीपीड) किडिंचे नैसर्गीक नियंत्रण होते.
पैसा (मिलीपीड) करीता लॅम्डा सायलोथ्रिन या रासायनिक कीटकनाशकाची 15 मीली प्रती 10 लिटर पाण्यामध्ये पिकांवर फवारणी करावी.शेतकऱ्यांनी केलेला प्रभावी उपाय आहे.गोगलगायकरीता मेटाअल्डीहाईड गोळया (स्नेलकील)-दोन कि.ग्रॅ./एकर गोळया शेतात फेकाव्यात. किंवा पैसा (मिलीपीड) व गोगलगाय दोन्ही कीडींच्या नियंत्रणा करीता दोन किलो ज्वारीचा भरडा करून 50 मिली पाच टक्के फिप्रोनिल (रिजेंट)कीटकनाशक त्यामध्ये मिसळून प्रभावग्रस्त पिकांच्या ओळीमध्ये फेकावे.हा शेतकऱ्यांनी केलेला प्रभावी उपाय आहे.परंतु हा भरडा पक्षी आणि पाळीव प्राणी खाणार नाहीत. याची दक्षता घेण्याची गरज आहे.दुर्लक्ष झाल्यास या कीडींमुळे मोठयाप्रमाणावर आर्थिक नुकसान संभवत असल्याने त्याचे वेळीच नियंत्रण करावे,असे आवाहन osmanabad जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.
*****