उस्मानाबाद जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवाड्याचे१५ ते ३० जुलै दरम्यान आयोजन

0


उस्मानाबाद,दि.14(जिमाका ) :-  जिल्ह्यामध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम 15 ते 30 जुलै 2021 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अर्भक मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान व मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्सचे एक उद्दिष्ट आहे.

देशात पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण आहे. 11 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि या बालकांचे मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त असते. यामुळे जिल्ह्यात 15 ते 30 जुलै 2021 या कालावधीत जिल्हयात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन करण्याबाबतची बैठक जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. या कालावधीमध्ये 1246 आशा स्वयंसेविकांच्या माध्यमांतून शून्य ते पाच वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांच्या घरी भेट देवून ओ.आर.एस. पॉकिट आणि ज्या बालकांना अतिसार असेल अशा बालकांना झिंक गोळयांचे वाटप करण्यात येईल.संबंधित बालकांच्या घरी स्वच्छता राखणे, हात धुणे यांचे प्रात्यक्षिकही आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

हा पंधरवाडा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना श्री.गुप्ता यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.या बैठकीस महिला व बालकल्याण उपमुख्यकार्यकारी अधिकारी निपाणीकर,उप अभियंता पाणी पुरवठा श्री.देवकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील,शिक्षणधिकारी श्री.सुसर,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.के.के. मिटकरी, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हलकुडे,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.परळीकर,आयएमए चे प्रतिनिधी डॉ.सचिन बोडके,आयएपी चे प्रतिनिधी डॉ.सागर रामढवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण गरड, जिल्हा सनियंत्रण मुल्यमापण अधिकारी किशोर तांदळे, जिल्हा आशा समन्वयक श्री. सतीश गिरी आदी उपस्थित होते.
 
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top