उस्मानाबाद, दि. २०- मागील पाच वर्षांपासून पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणार्या बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने यंदा गावातील आठशेहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन करून विधिवत विसर्जन करण्यात आले.
बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने मागील पाच वर्षांपासून वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबिर तसेच गणेशोत्सवात विसर्जनासाठी गावातील गणेशमूर्तींचे संकलन केले जाते. यंदा रविवारी गणेश विसर्जनदिनी गावातील मल्लिाकार्जून मंदिर येथे गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर गावातील घरगुती आठशे गणेशमूर्ती व विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. तसेच विसर्जनावेळी पाणी प्रदूषण होवू नये यासाठी निर्माल्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच संकलित केलेल्या आठशेहून अधिक गणेशमूर्ती उमरेगव्हाण शिवारात असलेल्या मोठ्या खदाणीच्या जलसाठ्यात विसर्जित करण्यात आल्या.
दरम्यान गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे, पोलीस नाईक सचिन कपाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. रोहित राठोड, ऍड. उपेंद्र कटके, केशव नळेगावकर, गोविंद पाटील, भाजपाचे नवनाथ कांबळे यांनी सदिच्छा भेट देवून उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. सायंकाळी ७.३० वाजता दिवसभरात संकलित झालेल्या आठशेहून अधिक मूर्तींची आरती करून गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यासाठी ग्रामसेवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.