प्रा. सविता पाटील यांना पीएच्.डी. पदवी प्रदान
उस्मानाबाद,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या वतीने नुकतीच प्रा. सविता पाटील यांना पीएच्.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखा अंतर्गत पीएच्.डी. मराठी संशोधनासाठी त्यांनी, "मराठवाडा मुक्ती संग्रामातील निवडक स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्मचरित्र : एक सामाजिक व वाड्मयीन अभ्यास" हा विषय घेऊन आपले संशोधनविषयीचे चिंतन विद्यापीठाला सादर केले होते. या प्रबंधाची मौखिक परीक्षा दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 04 ते 05 या वेळेत पार पडली. या मौखिक परीक्षेला बहिःस्थ परीक्षक म्हणून प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी,( स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) हे होते तर मौखिक परीक्षेच्या अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. दासू वैद्य मराठी विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे होते. जवळपास 25 संशोधक अभ्यासक प्राध्यापकांनी या मौखिक परीक्षेला ऑनलाईन उपस्थिती दर्शविली होती. अत्यंत महत्त्वपूर्ण व दुर्लक्षित अशा विषयावर संशोधन करून प्रा. पाटील यांनी मिळविलेले यश हे अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. अशा भावना बहिःस्थ परीक्षक डॉ.मार्तंड कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. तर, सेवानिवृत्तीनंतरही संशोधनाची प्रवृत्ती जोपासून प्रा. पाटील यांनी केलेले कार्य लौकिकास्पद आहे असे उद्गार डॉ. वैद्य यांनी काढले. प्रो. डॉ. केशव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास आठ वर्ष सातत्याने अभ्यास करून प्रा.सविता पाटील यांनी सहाशे पृष्ठांचा शोधप्रबंध डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सादर केला होता. या शोधप्रबंधांची योग्य ती तपासणी बहिःस्थ परीक्षकांकडून करून घेऊन विद्यापीठाने सकारात्मक अहवालाच्या आधारावर मौखिक परीक्षा घेऊन, यशस्वीरित्या पार केलेल्या मौखिक परीक्षेच्या आधारे प्रा. डॉ. सविता पाटील यांना पीएच्.डी. अर्थात विद्यावाचस्पती ही पदवी बहाल केली आहे. प्रा. पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतरही संशोधनामध्ये दाखविलेला रस आणि त्यांची चिकाटीने कोणतीही काम पूर्णत्वास नेण्याची प्रवृत्ती खऱ्या अर्थाने त्यांच्या संशोधनाला पूर्णत्व प्राप्त करून देण्यास सहाय्यभूत ठरली असे दिसून येते.त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अनेकांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने हे संशोधन कार्य पूर्णत्वास नेऊ शकले. या प्रामाणिक भावनाही व्यक्त केल्या. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद येथे प्राध्यापक म्हणून काम करताना आलेले अनुभव आणि तिथूनच खऱ्या अर्थाने संशोधन कार्याला मिळालेली चालना हेच माझ्या यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा मा. शुभांगीताई गावडे, मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पती प्रा. विजयकुमार साळुंके, चि.इंजि. धर्येशिल आणि चि. डॉ.अमरसिंह साळुंके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.