या योजनेंसंदर्भात माहिती देताना राजेंद्र कुरमुडा व विजयकुमार फटके म्हणाले की, दोन वर्षापासून देशभरात कोरोनाचे सावट असल्याने पहिली, दुसरी लाट येऊन गेली असताना आता तिसऱया लाटेची टांगती तलवार डोक्यावर लटकत आहे. कोरोनाकाळातील लॉकडाऊन, अनलॉकमुळे बहुतांशी व्यवहार डबघाईला आले आहेत. यातच शेतकरीही भरडला गेल्याने तो मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
बँकेतील थकबाकीमुळे नवीन कर्ज मिळत नसल्याने त्याला खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. शेतकऱयांच्या हितासाठी त्याला कर्जमुक्त करण्याची संधी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिली आहे. बळीराजा तारणहार योजनेंतर्गत कर्जफेड करताना थकीत रकमेच्या व्याजात घसघशीत सूट देऊन तत्काळ नवीन कर्ज मिळणार आहे. थकीत कर्जावरील व्याजावर तब्बल 60 ते 75 टक्के सवलत शेतकऱयांना दिली जाणार आहे. ही योजना अधिक सोपी करण्यासाठी बँकेने ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. या योजनेची मुदत एक जानेवारीपासून 31 मार्च पर्यंत आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱयांनी या योजनेत सहभागी होऊन कर्जमुक्त व्हावे असे आवाहनही राजेंद्र कुरमुडा व विजयकुमार फटके यांनी केले आहे.