माळुंब्रा येथे शाळापूर्व तयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

0
  

तामलवाडी :- दि.25 मार्च राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल पात्र बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत 'शाळा पूर्वतयारी अभियान' या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या उपक्रमांमध्ये 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेचा सहभाग आहे.त्या अनुषंगाने सूरतगाव केंद्रातील सर्व जि.प.शाळांतील इ.1ली ते 5 वी.ला अध्यापन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व अंगणवाडी ताई असे  एकूण 82 प्रशिक्षणार्थ्यांसाठी  प्रशिक्षणाचे आयोजन जि.प.प्रशाला माळुंब्रा येथे गटशिक्षणाधिकारी  अर्जुन जाधव यांच्या नियंत्रणाखाली व केंद्रप्रमुख . राजेश धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 मार्च रोजी करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची शाळा पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत मुले व पालक यांचे मार्चअखेर एक व जूनच्या प्रारंभी एक असे दोन मेळावे शाळा स्तरावर घेण्यात येणार आहेत. पहिल्या मेळाव्यात मुले पहिलीत दाखल होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये मूलभूत क्षमता किती विकसित आहेत यांची नोंद कृतीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ज्या मुलांना मूलभूत क्षमता आवश्यक असलेल्या कृती करताना मदतीची गरज लागते त्या मुलांच्या पालकांना शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे.

तर दुसऱ्या मेळाव्या पर्यंत च्या कालावधीत पालकांच्या भेटी घेऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.

 मागील दोन वर्षांपासून covid-19 च्या प्रकल्पात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाले. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारी अंगणवाडी केंद्रे देखील बंद आहेत. यामुळे या वर्षी शाळेत दाखल होणारी बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेली बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झालेले नाही.त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी  शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी या अभियानाची मदत होणार आहे.  शाळा पूर्व तयारी मेळावे कशा पद्धतीने घ्यावेत याबाबतची रंगीत तालीम पूर्व प्राथमिक बालकांच्या मदतीने मेळावाआयोजित करून घेण्यात आली.या मेळाव्यास  गुणवंत चव्हाण व शांताराम कुंभार यांनी सुलभक म्हणून काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top