सामाजिक समतेचं गाणं :उजेडवाटा

0

सामाजिक समतेचं गाणं :उजेडवाटा

प्रा.डॉ. दादाराव गुंडरे हे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे मराठी विषयाचे अध्यापन कार्य करतात. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती महाविद्यालयात  आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे . त्यांनी  ' मराठी कवितेतील महानायकांचे दर्शन ' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित केलेला असून त्या ग्रंथास अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कवीचा जन्म लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गरसुळी या छोट्याशा गावी झाला.ज्या मातीत खेळलो,बागडलो , लहानाचा मोठा झालो , आपणही त्या मातीचे  देणे लागतो , हा उदात्त दृष्टीकोन कवी समोर ठेवतो . कवी 'उजेडवाटा' हा काव्यसंग्रह आपल्या गावातील अखंड हाल-अपेष्टा सहन करून जीवन जगणारा ग्रामीण कष्टकरी, मजूर, शेतकरी यांना समर्पित करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो . अवतीभवतीचं समाज वास्तव लेखणीच्या माध्यमातून टिपत असताना 'उजेडवाटा' या पहिल्याच काव्यसंग्रहात वैविध्यपूर्ण जीवन जाणिवा प्रकट करतो.  संत महात्म्य,समाजसुधारक,महापुरुषांच्या विचाराचा जागर केला पाहिजे. महापुरुषांचे विचार तळागाळातील समाज मनापर्यंत पोहचविले पाहिजेत,तरच मरगळलेल्या अवस्थेत असणारा समाज जागा होणार आहे ,सामाजिक प्रगती होणार आहे, याची कवीला जाण आहे. 
     मानवी मूल्यांवर कवीची अढळ निष्ठा आहे. आज जात ,धर्म, पंथ या गोष्टीमध्ये माणूस गुरफटत चालला आहे .माणसा-माणसात दरी वाढत  आहे . मानवाला त्यातून बाहेर काढावयाचे असेल तर  संत महंतांचे , समाजसुधारकांचे विचार  समाज मनात रुजवणे गरजेचे आहे ,असे कवीला वाटते. 

     'तूच मार्ग दाता' या कवितेतून जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा विचार कवी मांडतो. जगाला युद्ध नको बुद्ध हवा  हा विश्वाच्या उन्नतीचा सिद्धांत कवी कवितेतून अधोरेखित करतो. कर्मयोगी महात्मा बसवेश्वर यांनी प्रयत्नवादाची कास धरून  जातीभेदाला विरोध केला आणि समाजात सर्वधर्मसमभावाचे विचार  पेरले हे  'कर्मयोगी महात्मा बसवेश्वर' या कवितेतून कवी अत्यंत प्रगल्भतेने  मांडतो .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोक कल्याणकारी कार्याचे विवेचन अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने कवी करतो.   छत्रपती शिवाजी महाराजांचे  कार्य 'रयतेचा राजा' या कवितेद्वारे स्पष्ट  करतो.  छत्रपती शाहू महाराजांचे करवीर नगरीतील लोकाभिमुख कार्य 'लोकराजा' कवितेच्या माध्यमातून समोर ठेवतो . साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून, साहित्यातून उपेक्षित,कष्टकरी,भटक्या ,वंचित समाजाच्या वेदना मांडल्या. ' क्रांतीप्रवण अण्णाभाऊ साठे' या कवितेतून त्यांच्या कार्याचा गौरव करतात.'राष्ट्रमाता' या काव्यातून राजमाता जिजाऊंच्या थोर कार्याचा गौरव करताना म्हणतात ,'गाजवून स्वकर्तृत्व स्वराज्य स्थापनेचा ध्यास मना,
दिव्य संस्कार बळ देऊनि घडविले  शिवबांना'(३१).
       'ज्ञानज्योत' , 'क्रांतीज्योती' या कवितेतून  सावित्रीबाई फुले यांचे स्त्रीशिक्षण ,समाजसुधारणा विषयक अलौकिक कार्य  , 'थोरवी रमाईची','थोरवी रमाई'या कवितेतून रमाईच्या  कार्याची थोरवी गातात.महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली.  शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही, हा मूलमंत्र समाजाला दिला .स्त्रीमुक्तीसाठी प्रयत्न केले .जातीयता निर्मूलनासाठी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला.  महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव  ' क्रांतीसुर्य ' या कवितेत रेखाटतात .
      गोरगरीबांची मुले शिकली पाहिजेत,खेड्यापाड्यात,वाडया वस्तीवर शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचली पाहिजे.शिक्षणाने मानवी जीवन सुसंस्कृत होते.समाज सुधाणेसाठी 
शिक्षण अत्यावश्यक आहे. शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम  कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. सर्वसामान्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.  'कर्मवीरांना वंदन करूया' या कवितेतून त्यांच्या शैक्षणिक कार्याची थोरवी गातो. कर्मवीर जगदाळे मामा यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव 'थोर ज्ञानपुजारी' या कवितेतून करतो. 
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी ग्रामीण भागात शिक्षणाची पंढरी निर्माण केली . त्यांची महती 'ज्ञानयात्री'कवितेतून गातो .'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा'हा मूलमंत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समग्र जनतेला दिला.महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची बीजे रोवली . आज त्याची गोड फळे आपण चाखत आहोत.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही , शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन  होवू शकते ,याची कवीला जाण आहे.

             जातीयता माणसाच्या मनात खोलवर रुजलेली होती. हौदावर जनावरांना पाणी पिण्यास परवानगी होती, परंतु दलितांना पाण्याला  स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता .या पृथ्वीतलावर  सात कोटी जनता बहिष्कृत जीवन जगत होती , त्यांचे मूलभूत हक्क ही या व्यवस्थेने हिरावून घेतले होते .  अस्पृश्यता , जातीयता नष्ट करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंड आयुष्य वेचले .स्वातंत्र्य, समता, बंधुता निर्माण झाली पाहिजे , हा विचार मनामनात रुजविला.  कवी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव  'महानायक' या कवितेतून अविष्कृत करतो . 
         'अश्रूंचा ठेवा' या कवितेत मानवी जीवनातील हतबलता प्रकट करतो.सुखाच्या शोधात असणाऱ्या माणसाच्या वाट्याला दुःख कधी येतं ,हे लक्षात येत नाही.कवी सुख - दुःखाविषयी  कवितेत म्हणतो ,
'पदरी सुखापरि दुःख ते अधिक
कधी चांदणं तर कधी काळोख'(प्र.क्र.५३)
          कवी काळाचं अत्यंत भयावह,दुःखद,अवतीभवती पाहिलेलं, अनुभवलेलं चित्र मोजक्या शब्दांत काव्यातून अचूक टिपतो.अंधारात चाचपडणाऱ्या माणसाचे जीवन प्रकाशमान व्हावे . सर्वसामान्य माणसाचे आयुष्य उजळून निघावे . मानवी जीवनातील अज्ञान,अंधश्रद्धा ,दारिद्र्य,विषमता नष्ट होऊन कामगारांच्या,कष्टकऱ्यांच्या,जीवनात  सुख समाधान नांदावं .गरीब ,कष्टकरी,शोषित ,पिडीत, कामगार वर्ग सुखी समाधानी व्हावा.माणसाला माणूसपण प्राप्त व्हावं, हाच  दृष्टीकोन समोर ठेवून 'उजेडवाटा ' तील कवितेची निर्मिती झालेली  दिसते . ही कविता आपल्याला जवळची वाटते. 
'शेतकरी बाप 'या कवितेतून अहोरात्र शेतात राबणाऱ्या बापाचे दुःख कवी समग्र समाजासमोर मांडतो.
'ढोर मेहनतीस त्याच्या कधी मिळेल हो न्याय
येई सुखाचं चांदणं माझ्या बापाच्या मुखावर'(प्र.क्र.४३)
                     अखंड अहोरात्र शेतात राबणाऱ्या ,काळ्या आईची निष्ठेने सेवा करणाऱ्या बळीराजाच्या घामाला भरघोस पीक यावं,त्याच्या कष्टाला किंमत मिळावी,त्याच्या जीवनात परिवर्तन घडावं ,  ही आशा कवी बाळगतो .'मुलगी म्हणजे' या कवितेतून मुलीविषयीचा प्रेमभाव व्यक्त करतो. घराचं मांगल्य, मायेची,ममतेची शिदोरी म्हणजे आई तिचा महिमा 'आई तुझे थोरपण'या काव्यातून गातो.तर 'लेकुरवाळी माय' ही कविता वर्तमान स्थितीवर प्रकाश टाकते.अखंड हालअपेष्टा सोसून मुलांची काळजी घेणारी आई लेकरांच्या पंखात बळ आलं की एकदम भुर्रकन उडून जातात .कवी आईच्या व्यथा आणि वेदना व्यक्त करतो,
'आलिशान बंगला नाव आईची पुण्याई
परी जन्मदात्या आईलाच त्यात थारा नाही'(प्र.क्र.५२)

     मायेची वीण घट्ट झाली पाहिजे.विभक्तकुटुंब पद्धती जन्माला आली.वृद्धाश्रम वाढू लागले.कुटुंबातील प्रेमाला ओहोटी लागली.गोतावळ्यात रमणारा माणूस एकलकोंडा झाला,नात्यातील आटलेले प्रेम याची कवीला खंत वाटते . बिघडलेल्या स्थितीचे चित्र 'कुटुंबाचे कुलगुरू','नाते मैत्रीचे','संस्कृती' या कवितेतून मांडतात. शिक्षण,नोकरी,उद्योग,व्यवसायाच्या निमित्ताने ग्रामीण माणूस शहरात जातो.हळूहळू आपलं गाव, आपली जिवाभावाची माणसं विसरून जातो . खेडी ओस पडू लागली,शहरे फुगू लागली ,याची कवीला खंत वाटते. कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेला मानव,त्याच्या वाट्याला आलेल्या अगतिक जीवनाचे चित्रण 'वियोगाचं दुःख','कोरोनाचे दशावतार','गो कोरोना व्हायरस,'लढा कोरोनाशी' या कवितेत शब्दबद्ध करतो .उजेडवाटा' या काव्यसंग्रहात महापुरुषांचे जीवन  चित्रित करणाऱ्या कविता बहुतांश आहेत.त्याचबरोबर माय-बाप,शेतकरी,कष्टकरी,शिक्षणव्यवस्था, कोरोना , गाव खेडं हा त्यांच्या कवितेचा विषय होतो . त्यांच्या अनेक कवितेत प्रतिमा आणि प्रतिके आलेली दिसून येतात,त्यामुळे कवितेला गोडवा निर्माण झालेला दिसून येतो.त्यामध्ये विषमतेच्या ओसाड रानी,धम्माची बाग बहरली,गावपांढरीच जीवन,अश्रू आम्रवृक्षाची सावली,अश्रू चैत्राची पालवी,अश्रू मानवतेचा सेतू,रास घामाची,सुखाचं चांदणं,मातीचा सेवेकरी,घामाचं तोरण,तृप्तीचा ढेकर अशा सौंदर्यपूर्ण शब्दांची भर कवितेत पडलेली दिसून येते.  

     मानवी जीवनावर अढळ निष्ठा असणारा संवेदनशील मनाचा हा कवी आहे.  मानवी जीवनाला ,माणसाला माणूसपण प्राप्त व्हावं . महापुरुषांचे विचार समाज मनात रुजावेत, हाच उदात्त हेतू समोर ठेवून तो कवितेतून समतेचं,समाजप्रबोधनाच गाणं गातो .उपेक्षितांचे दुःख कवितेतून उजागर करतो. महापुरुषांचे , महामानवांचे विचार काव्याच्या माध्यमातून समग्र समाजमनावर कोरून सामाजिक समता निर्माण व्हायला हवी, हा आशावाद  बाळगतो.'उजेडवाटा'या काव्यसंग्रहात ४५ कविता असून  सुप्रसिद्ध कवी बालाजी इंगळे यांची प्रस्तावना लाभली  आहे.तसेच कवी डॉ.शिवाजी शिंदे यांनी पृष्ठावर सुंदर परीक्षण लिहिले आहे. अरुणा प्रकाशन लातूर यांनी  प्रकाशित केला आहे. निश्चितच हा काव्यसंग्रह वाचनीय असून प्रत्येकाच्या ठायी असावा असा आहे .वाचक नक्कीच त्याचे स्वागतच करतील . कवी डॉ.दादाराव गुंडरे यांच्या हातून यापुढेही उत्तमोत्तम ,सकस काव्यरचना निर्माण व्हाव्यात , याच अपेक्षेसह त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देतो.

*प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे*
   सहाय्यक प्राध्यापक,मराठी विभाग
तेरणा महाविद्यालय(कला ,विज्ञान व वाणिज्य),उस्मानाबाद
9881103941

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top