Osmanabad news :-
जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईला जाणार
उस्मानाबाद -
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका आणि मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येत्या 2 एप्रिल रोजी होणार्या गुढी पाडवा मेळाव्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक उस्मानाबाद येथे घेण्यात आली. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका मेळाव्यासाठी मुंबईला जाण्याबाबत चर्चा करण्यात आली.
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात आली. बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष गपाट म्हणाले की, मनसेच्या पदाधिकार्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढा दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी जनतेच्या मनात आपुलकीची भावना आहे. म्हणून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. 2 एप्रिल रोजी मुंबई येथे होणार्या गुढी पाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणुकीची रणनीती ठरवून सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोंदर, तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, वीज कामगार सेनेचे राज्य सचिव विशाल कांबळे, जिल्हा सचिव दादा कांबळे, शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, मनविसे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, मनसे शिक्षक सेनेचे राहुल बचाटे, कळंब तालुका सचिव गोपाळ घोगरे, शिवानंद ढोरमारे, शहर उपाध्यक्ष सुधीर शिंगाडे, तालुका उपाध्यक्ष सलीम औटी, विक्रम गपाट, अजय ताबिले, बलभीम बनसोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.