उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणूकीचे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद,दि.25(जिमाका):- जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1966 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांच्या राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे पारुप प्रसिध्द करुन त्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह, भूम पंचायत समिती (तहसील कार्यालय), वाशी पंचायत समिती (तहसील कार्यालय), कळंब पंचायत समिती, उस्मानाबाद पंचायत समिती (महसूल भवन, तहसील कार्यालय), परंडा पंचायत समिती (तहसील कार्यालय), तुळजापूर पंचायत समिती, लोहारा पंचायत समिती (तहसील कार्यालय), उमरगा पंचायत समिती या ठिकाणी दि.28 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता ते संपेपर्यंत सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
29 जुलै 2022 रोजी आरक्षणाचे पारुप प्रसिध्द करण्यात येईल आणि आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दि. 29 जुलै 2022 ते 02 ऑगस्ट 2022 आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी आणि वेळेवर हजर राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.