श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

0

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

भाविकांच्या सेवेसाठी महसूल, पोलिस आणि मंदिर प्रशासन पूर्णपणे सज्ज

उस्मानाबाद,दि.21(जिमाका):- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशासनाने शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी केली आहे. मागील दोन वर्षे कोविडचे निर्बंध होते आता कोविडचे निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच तेलंगणा मधूनसुद्धा भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, तुळजाभवानी मंदिर प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पूर्णपणे सज्ज आहेत, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले.

 26 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे, त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे, तहसीलदार तथा मंदिर प्रशासक योगिता कोल्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, पोलिस निरीक्षक अजीनाथ काशीद, सहा.पोलिस निरीक्षक अमित म्हस्के आदी उपस्थित होते. पार्कींगची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज आणि इतर सुविधा ज्या असतील त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन केलेला आहे. त्याची माहिती सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत आणि कुठेही ट्रॅफिक आणू नयेत, तसेच चालत येणाऱ्या भाविकांना गर्दीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. मात्र या जोडीला प्रशासनातर्फे भाविकांना विनंती अशी आहे की, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि पोलीस विभाग हे आपल्या मदतीसाठी आहेत आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी यावेळी केले.

एका दिवशी एक लाखापेक्षा अधिक भाविक हे रोजचं समीकरण आपल्याकडे नवरात्र मध्ये असतं आणि अशा वेळेस जर आपण सूचना पाळल्या नाहीत, तर आपल्या मंदिराचा जो परिसर आहे तो खूप चिंचोळ्या रस्त्याने भरलेला आहे. त्याच्यामुळे गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये या दृष्टीने आपण सगळ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे. मंदिर प्रशासनाचा असा प्रयत्न आहे की भाविकांना लवकरात लवकर दर्शन व्यवस्थीत पार पाडता यावे आणि त्या दृष्टीने जे शुल्क पास किंवा व्हीआयपी पास आहेत ते सोडून इतर फ्री पासेस साठी कुठल्याही लाईनला आपल्याला थांबायची गरज नाही. आपल्याला थेट मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत घाटशील पार्किंग मधून आपल्याला प्रवेश मिळणार आहे. त्याच्यामुळे जो वेळ वाचेल त्याच्यातून भाविकांना मदतच होणार आहे.  तसेच तिथे रांगेमध्ये थांबून राहणे, वादविवाद करणे किंवा तिथे पोलिसांना अडथळा करणे अशा प्रकार होऊ नये, असेही आवाहन सर्व नागरिक आणि भाविकांना श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

मंदिर प्रशासनाकडून व्हॉटस्अप नंबर सुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत. त्या whatsapp नंबरवर जर आपल्याला कुठल्या संशयास्पद व्यक्ती बद्दलची काही तक्रार असेल, एखादा फोटो असेल, एखादा गैर प्रकार चालू असेल आणि त्याबद्दलची माहिती द्यायची असेल तर नागरिकांनी थेट मंदिर प्रशासनास द्यावेत. आपला नंबर, नाव हे मंदिर प्रशासन कोणासही सांगणार नाही, गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. मात्र जे काही गोंधळ माजवणाऱ्या किंवा लोकांना त्रास देणाऱ्याच्या प्रवृत्ती आहे, त्याचा निपटारा करणे हे पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन दोघांचंही कर्तव्य आहे, असेही श्री.दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले.

 मंदिरात आत गेल्यानंतर दर्शनाच्या वेळेस काही तक्रारी निदर्शनास येतात  अशावेळेस जर लवकर प्रशासनास सूचना मिळाली तर मंदिर प्रशासन हे  “देवळे कवायत” या तुळजाभवानीच्या कायद्याच्या अनुषंगाने प्रशासन कारवाई करण्यात येईल. मंदिर प्रशासनाकडे पब्लिक अनाउन्समेंट सिस्टिम्स जिथे असतील, त्या त्या पॉईंट्सना मंदिर परिसरामध्ये पोलीस आणि मंदिर प्रशासनाचे लोक हे लोकांच्या तक्रारी ऐकून त्याचा निपटारा करण्यासाठी सुद्धा बसलेले असणार आहेत. शारदीय नवरात्र उत्सव हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या श्री. तुळजाभवानी देवींजींचा वार्षिक उत्सव आहे. त्याचा आनंद सर्व नागरिक आणि भाविकांनी  घ्यावा, असेही आवाहन श्री. दिवेगावकर यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची बारकाईने पाहणी केली. येथील स्वच्छता आणि इतर व्यवस्थापनाबाबत चौकशी केली आणि आवश्यक केल्या.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top