जास्तीत जास्त नुकसानीची टक्केवारो गृहीत धरून खरीप २०२० चा विमा वितरित करावा - आ.राणाजगजितसिंह पाटील
खरीप २०२० पीक विम्या बाबतचा मा. उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल कायम ठेवत मा. सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यात म्हणजे २७/०९/२०२२ पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्याचा अभूतपूर्व निर्णय दिला आहे.
न्याय्य व हक्काची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अगोदरच शेतकऱ्यांना जवळपास दोन वर्षे वाट पहावी लागली असून आता तरी या निर्णयाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी व विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन तीन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील या अनुषंगाने योग्य ते निर्देश देण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी आयुक्त श्री. धीरज कुमार यांना दिल्या आहेत.
खरीप २०२० हंगामामध्ये सोयाबीन पिकाचा विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार असून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी बजाज अलियान्झ कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहेत.
विमा कंपनीने जवळपास ७९ हजार शेतकऱ्यांना खरीप २०२० चा विमा यापूर्वी वितरित केला असून पिक विमा देताना कंपनीने नुकसानीची टक्केवारी नमूद केलेली आहे, त्यानुसार जास्तीत जास्त नुकसानीची टक्केवारी गृहीत धरून त्याप्रमाणे नुकसान भरपाई निश्चित करावी तसेच विमा भरलेला एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.