अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- उस्मानाबाद नगरपालिका किंवा शहराच्या ठिकाणी इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमधून उपलब्ध करुन देण्यात येतात.
शैक्षणिक वर्ष 2022-23 (नवीन व नुतनीकरण) या वर्षातील प्रवेशित अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याकरिता www.syo.mahasamajkalyan.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्याकरिता www.syo.mahasamajkalyan.in हे संकेतस्थळ दि.26 जानेवारी 2023 पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या योजनेकरिता इयत्ता अकरावी आणि प्रथम वर्षास प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज म्हणून अर्ज भरावा आणि ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी (इयत्ता अकरावी प्रथम किंवा द्वितीय वर्षास) या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांनी नुतनीकरण म्हणून अर्ज भरावा तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे परिपूर्ण अर्ज भरुन त्याची एक प्रत संबंधित अभिलेखे जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, उस्मानाबाद या कार्यालयास दि.28 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.