ट्राफिक पोलिसांची ग्रामीण परिसरात जोरदार वसुली सुरु ! शहरातील वाहतूक व्यवस्थेचा झाला बट्याबोळ , वसुलीसाठी कुत्तर चढाओढ लागली
उस्मानाबाद दि.१६ (प्रतिनिधी) - शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी खास वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्थेवर देखरेख करण्याऐवजी ग्रामीण भागातील वाहनांवर कारवाई करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक वसूली केली जात आहे. त्यामुळे या पोलिसांना अशा प्रकारे वसुली करण्याची परवानगी कोणी व कशासाठी दिली अशी चर्चा वाहनधारकातून होऊ लागली आहे.
उस्मानाबाद शहरातील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी खास
निर्माण केलेल्या वाहतूक शाखेत ३० वाहतूक पोलिसांची नेमणूक करणाऱ्यात आली आहे. मात्र यापैकी काही वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस नेमून दिलेल्या सिग्नल पॉईंट व इतर ठिकाणी ते थांबतच नाहीत. त्या सोडून बार्शी रस्त्यावरील साईराम नगर भागात चक्क दुपारी १२.०५ वाजण्याच्या सुमारास राजरोसपणे येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांची अडवणूक करून थेट आर्थिक वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसत आहे.
या संदर्भात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मस्के यांना वाहतूक नियंत्रण शेखे अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे ? असे विचारले असता काही कर्मचारी ऊर्स उत्सव बंदोबस्तावर आहेत, असे सांगून त्यांनी बनसोडे या कर्मचाऱ्यांकडे फोन दिला. तर बनसोडे यांनी माहिती देता येत नाही. त्यासाठी लेखी स्वरूपात अर्ज दिल्याशिवाय माहिती दिली जाणार नाही असे सांगत माहिती देणे टाळले.
वाहतूक पोलिसांना उस्मानाबाद शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहर पोलीस ठाणे, राजमाता जिजाऊ चौक, जिल्हा न्यायालय, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत चौक व देशपांडे बस थांबा हे पॉईंट नेमून दिलेले आहेत. मात्र या ठिकाणी हे पोलीस न थांबता इतरत्र काय मिळते का यासाठी सतत फिरत आहेत. या पोलिसांना इतरत्र जाऊन वसुली करण्याचा अधिकार नेणका कोणी दिला. तसेच या पोलिसांवर नेमका वचक आहे की नाही ? यासह विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.
शहर वाहतूक पोलिसांना ग्रामीण भागात जाऊन कारवाई करण्याचा अधिकार आहे का ? जर अधिकार नसेल तर कारवाई करण्यासाठी कोणाची परवानगी घेतली. तसेच शहरातील विस्कळीत झालेल्या व होत असलेल्या वाहतुकीस जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.