ईपीएस ९५ निवृत्त कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळावी यासाठी केला रास्ता रोको
उस्मानाबाद दि.१५ (प्रतिनिधी) - सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना पगाराचा ८.३३ टक्के भाग पेन्शनसाठी कपात करण्यात आलेला आहे. मात्र टेन्शन मिळत आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन देण्यात यावी, या मागणीसाठी ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय समिती व लोककल्याण संस्थेच्यावतीने शिंगोली सर्किट हाऊस समोरील चौकामध्ये दि.१५ मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
देशातील ७० लाख ईपीएस-९५ निवृत्त कर्मचारी अल्प पेन्शनधारक असून पेन्शन वाढीसाठी २०१४ पासून आंदोलन करीत आहेत. ईपीएस - ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे यापूर्वी प्रधानमंत्री, अर्थमंत्री, श्रम मंत्री व ईपीएफओ समितीला वारंवार भेटून निवेदने दिलेली आहेत. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मागण्या योग्य असून लवकरच कारवाई करण्यात येईल आश्वासन दिले होते. परंतु याबाबत अद्याप पर्यंत दुर्दैवाने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना ७०० ते २ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळत असून दैनंदिन प्राथमिक गरजा देखील भागविणे अशक्य होत आहे. जिल्ह्यात 32 हजार पेन्शनधारकांची संख्या असून त्यांना पेन्शन वाढ लवकरात लवकर करण्यात यावी या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोरे, समन्वयक डी.एम. पाटील, उपाध्यक्ष बाबा सोनटक्के, सचिव बी.के. शिंदे, कुशल संघटक बाळासाहेब माने, आर.एम. पवार, जी.एस. माने, रामेश्वर शेंडगे आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छाया राहुल कोरे आळणीकर