जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार - बाळकृष्ण तांबारे , कुठल्याही शिक्षकांनी संभ्रमावस्थेमध्ये राहू नये
उस्मानाबाद दि.१५ (प्रतिनिधी) - राज्यभरामध्ये महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये फूट पाडावी यासाठी संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे कुठल्याही शिक्षकाने संभ्रमावस्थेत राहू नये. तसेच मध्यवर्ती संघटना जोपर्यंत आपले आंदोलन मागे घेत नाही. तोपर्यंत एकाही शिक्षकाने या आंदोलनातून माघार घेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१५ मार्च रोजी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने उस्मानाबाद येथील बँक कॉलनीतील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, जिल्हा नेते एल.बी. पडवळ, पतसंस्थेचे चेअरमन मोहनराव जगदाळे, सरचिटणीस विठ्ठल माने, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप म्हेत्रे व जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत माने, राहुल भंडारे, दत्तात्रय पवार, शेषराव राठोड, उमेश भोसले, प्रशांत मिटकर, सचिन राऊत, बालाजी माळी, सुनील गफाट, बालाजी दंडनाईक, बालाजी पडवळ, किसन जावळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना तांबारे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सुरू केलेला बेमुदत संप याबाबत शिक्षक संघटनेत फूट पडावी यासाठी दि.१४ मार्च रोजी संभ्रम निर्माण केला आहे. याबाबत या संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या आंदोलनामध्ये शेवटपर्यंत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे एनपीएस धारकांना जुनी पेन्शन सुरू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती अधिकारी-कर्मचारी संघटनेच्यावतीने दि.१४ मार्चपासून राज्यभरात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. तर जुनी पेन्शन लागू करावी यासाठी गेल्या १४ वर्षापासून आम्ही शासन दरबारी निवेदने, आंदोलने या माध्यमातून सतत मागणी लावून धरलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही सरकारने आमच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष खदखदत असून तो असंतोष त्यांनी व्यक्त करावा यासाठी या आंदोलनास ४ दिवसांपूर्वीच शिक्षक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. तर शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नाबाबत मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत चर्चा झाली असून केंद्र प्रमुखाची पदे भरण्यासाठी संधी मिळणे, २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात घेतलेला निर्णय रद्द करणे, घरभाडे व शाळेपासून २० किलो मीटर अंतराच्या आत राहणे आदी विषयांवर त्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जुनी पेन्शन मिळावी यासाठी मध्यवर्ती संघटनेने जो लढा उभा केलेला आहे. त्या लढ्यामध्ये शिक्षक संघटना त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबतच्या लढ्यात शेवटपर्यंत सहभागी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे अनेकांची पाल्य म्हणजे मुले हे आपल्या आई-वडिलांना म्हातारपणी व्यवस्थितपणे सांभाळत नाहीत. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमाचा सहारा घ्यावा लागत असल्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी उमेदीची २५-३० वर्ष सरकारी नोकरीमध्ये सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना हक्काचे उत्पन्नाचे साधन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी जुनी पेन्शन देणे आवश्यक असल्याचे तांबारे यांनी सांगितले.
छाया राहुल कोरे आळणीकर