मुंबई : धर्मादाय योजने अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात अर्थिक दृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकडून वारंवार विवीध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या संदर्भात अनेक लोकप्रतिनिधी यांनी देखील चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात येणाऱ्या अडचणी सातत्याने मांडल्या आहेत. आजच्या घडीला राज्यात ४०० रुग्णालयांकडून दुर्बल घटकांना आवश्यक असलेली आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. रुग्णाकडे शिधा पत्रिका व तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे पुरेशी असताना अनेकदा रुग्णालयाकडून कागदपत्रांसाठी अडवणूक केली जाते. ती टाळली जावी व तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले. या विषयी बोलताना ॲड नार्वेकर यांनी रुग्णांना उपचार मिळण्यास दिरंगाई झाल्यास तसेच या संदर्भात या पुढे तक्रार प्राप्त झाल्यास तो सभागृहाचा अवमान समजला जाईल असेही सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, तसेच सार्वजनिक आरोग्य विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि धर्मदाय आयुक्त यांच्या उपस्थितीत आज दिनांक 21 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील त्यांच्या दालनात आरोग्य सुविधा प्राप्त होण्यासंदर्भात येणारे अडचणी व लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी यासाठी करावयाचे निराकरण याबाबत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आले होती.
या बैठकीस विधानसभा सदस्य सर्वश्री ॲड. राहुल कुल, राम सातपुते, अमीन पटेल, दादाराव केचे, श्रीमती माधुरी मिसाळ, श्रीमती वर्षाताई गायकवाड, प्रा. देवयानी फरांदे या उपस्थित होत्या.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी गरीब रुग्णांना जलद आरोग्य सेवा पुरविण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, उपलब्ध खाटांची माहिती देणारे ॲप तयार केले जाईल व या संदर्भात कुठलाही विलंब होऊ नये तसेच रुग्णांची कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये व संबंधितांनी रुग्णसेवा हे कार्य अधिक तत्परतेने व संवेदनशील पणे करावे अशा कडक सूचना निर्गमित केल्या.