जॉब कार्डचा परस्परच तुती रेशीम गटासाठी केला वापर
घरकुल रोजगार हमीचे हप्ते गेले कोणाच्या घशात, खिशात !
उस्मानाबाद दि.१ (प्रतिनिधी) - रमाई आवास योजनेच्या घरकुलाचे रोजगार हमीचे पैसे काढण्यासाठी दिलेले जॉब कार्ड त्या कामासाठी न वापरता ते तुती रेशीम गटासाठी परस्पर वापरून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी वाशीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे सुशील गाडे यांनी एका निवेदनाद्वारे दि.१० मार्च रोजी केली आहे. दरम्यान, रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत देण्यात येणारे रोजगार हमी योजनेचे हप्ते नेमके कोणाच्या खिशात व घशात गेले ? तसेच तुती लागवडीच्या नावाखाली हा नवीन आर्थिक घोटाळा पुढे आला असून संबंधितावर कोणती कारवाई होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील सुशील सुरेश गाडे रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत रोजगार हमीचे पैसे काढण्यासाठी जॉब कार्ड दिले होते. मात्र त्यांना घरकुल योजनेअंतर्गत रोजगार हमीची देण्यात येणारी रक्कम अजिबातच दिलेली नाही. त्याऐवजी दिलेले ते जॉब कार्ड रोजगार सेवक व ग्रामसेवक यांनी घरकुलच्या कामासाठी न वापरता ते परस्परच तुती रेशीम गटासाठी वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी गाडी यांना वर्क कोड एकच पडल्यामुळे तुमचा रोजगार हमीचा हप्ता मिळू शकत नाही. त्यामुळे रोजगार हमीचा हप्ता काढण्यासाठी नवीन जॉब कार्ड काढावे लागेल. तर नवीन जॉब कार्ड व रोजगार हमीचे हप्ते काढून देतो. मात्र त्यासाठी रोजगार सेवक व ग्रामसेवक हे दोघे ५ हजार रुपये लागतील असे सांगून ५ हजार रुपयांची मागणी करीत आहेत. त्यामुळे रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गाडे यांनी केली आहे.