स्त्रीभ्रुण हत्यावर आळा घालण्यासाठी उस्मानाबाद पीसीपीएनडीटी समिती पूर्णपणे सज्ज
· नागरिकांनी याबाबत माहिती देऊन सहकार्य करावे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांचे आवाहन.
· गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल
उस्मानाबाद,दि.22():- पीसीपीएनडीटी कायदा स्त्रीभ्रुण हत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी ठरलेला आहे. तथापि अजूनही लिंग निवडीचे पुरावे समोर येत आहेत. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान हे कायद्याने व सामाजिक मुल्यानुसार मोठा गुन्हा आहे. सोनोग्राफी यंत्राचा गैरवापर करुन स्त्रीभ्रुण हत्यावर आळा घालण्यासाठी उस्मानाबाद पीसीपीएनडीटी समिती पूर्णपणे सजग राहून काम करत आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक समितीच्या मासिक बैठकीच्या वेळी सांगितले.
डॉ.गलांडे म्हणाले, कायद्याची जनजागृती करण्यासाठी आशांची, अंगणवाडी व ए.एन.एम. यांची तालुकास्तरावर बैठक आयोजित करण्याबाबत सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर उमरगा, कळंब, उस्मानाबाद, परंडा या ठिकाणी सर्व खाजगी, शासकीय डॉक्टरांच्या कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येणार असून संशयीत अर्धवट गर्भपाताच्या पेशंटची एमएलसी करणे बाबत सर्व डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तालुकास्तरावर व ग्राम पातळीवर विविध बैठकीमध्ये पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सर्व सोनोग्राफी व एमटीपी केंद्राची नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचेही डॉ.गलांडे म्हणाले.गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बातमीची खातरजमा करुन त्या अनुषंगाने खटला दाखल केल्यावर एक लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल याकरिता ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ.गलांडे यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ.गलांडे यांनी ग्रामपंचायत स्तरावर बेटी बचाव बेटी पढाव ची प्रभावी अंमलबजावणी करणे. विविध शाळांमध्ये बेटी बचाव बेटी पढाव व पीसीपीएनडीटी कायद्याची जनजागृती करणे. किशोरवयीन मुला-मुली मध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे मार्गदर्शन करणे, तसेच गर्भलिंग निदान करणार नाही व करू देणार नाही याबाबत शपथ घेणे व जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर, संशयित गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर, व्यक्तीवर ठिकाणी डीकॉय केसेस करून दोषी आढळल्यास तात्काळ गुन्हा नोंद करण्यासाठी जनजागृतीपर अभियान राबविण्याबाबत समितीच्या सदस्यांना सूचना केल्या.
या बैठकीत यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील चव्हाण, पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुणे, डॉ.ललिता स्वामी, आयएमए अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, वरिष्ठ स्त्री रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी-सरोदे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. शैलजा मिटकरी, पीसीपीएनडीटी लिगल कौन्सिलर ॲड. रेणुका, जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत आदी उपस्थित होते.