उस्मानाबाद जिल्हयासह संपूर्ण राज्यात नियमीत लसीकरण "यू विन" अॅपव्दारे ऑनलाईन
उस्मानाबाद,दि,21( osmanabad news ):- सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत प्रत्येक गरोदर मातेचे तसेच जन्मलेल्या प्रत्येक बालकास जन्मापासून वयाच्या १६ या वर्षापर्यंत नियमीतपणे वयोगटानुसार शासकीय आरोग्य संस्थांमधून मोफत लसीकरण देण्यात येते. यासाठी प्रत्येक लाभार्थीस लसीकरण कार्ड देण्यात येवून संपूर्ण लसीकरण होईपर्यंत कार्ड संभाळून ठेवावे लागत होते. तसेच पुढील देय लसीची तारीखही लक्षात ठेवावी लागत होती. तसेच कोरोना प्रादुर्भावात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोविन हे अॅप होते. त्याच धर्तीवर या सर्व बाबी विचारात घेवून शासनाने लहान मुलांच्या लसीकरणासाठी U-Win हे ऑनलाईन अॅप सुरु केले असून संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात आणि उस्मानाबाद जिल्हयात आता या अॅपव्दारे नियमीत लसीकरण संचलीत होणार आहे.
वास्तविक पाहता या अॅपची सुरुवात उस्मानाबाद जिल्हयात सहा महिन्यापासून करण्यात आलेली आहे. सदर अॅप हे सहा महिन्यापूर्वी उस्मानाबाद जिल्हयात प्रायोगीक तत्वावर (पायलट प्रोजेक्ट म्हणून ) सुरु करण्यात आले होते. त्यानुसार तेव्हां पासून अनेक पालक बालकांच्या लसीकरणासाठी त्याचा वापर करुन लाभही घेत आहेत. या अॅपच्या माध्यमातून बालकांच्या लसीकरणासाठी नोंदणी करता येईल, तसेच लसीकरणाचे प्रमाणपत्रही त्याव्दारे मिळेल, पुढील लसीकरणाची तारीखही कळण्यास मदत होणार असून लहान मुलांच्या लसीकरणाची पूर्व सुचना मिळण्यासाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त असून यासाठी पालकांनी ज्या मोबाईल नंबर वरुन नोंदणी केली असेल त्याच क्रमांकावर लसीकरणा बाबत संदेश प्राप्त होणार आहे असे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी सांगीतले.
तरी या अॅपचा जास्तीत जास्त पालकांनी वापर करुन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहूल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीष हरीदास यांनी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत केले आहे.