वडगाव (सि.) येथील शेतकर्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
उस्मानाबाद, दि. २४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील वडगांव (सि.) येथील शेतकर्यांच्या रेल्वेमध्ये संपादीत होणार्या जमिनीचे दर वाटाघाटी पध्दतीने (थेट खरेदी) ठरविण्याची मागणी संबंधित शेतकर्यांच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्याकडे आज करण्यात आली आहे.
याबाबत शेतकर्यांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथील एकुण ८२ शेतकर्यांची ४४ गटातील एकुण १७ हेक्टर ४५ आर. एवढे क्षेत्र रेल्वेसाठी संपादीत करण्यात येत आहे. संपादीत होत असलेले क्षेत्र हे बागायती क्षेत्र आहे. परंतू, भुसंपादन अधिकार्यांनी संपादीत क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्र हे जिरायती दाखविले आहे ते आम्हास मान्य नाही. ज्या क्षेत्रामध्ये बोअरवेल व विहीरीची ७/१२ उतार्यावरती नोंद आहे, अशा क्षेत्राला बागायती क्षेत्र समजून आम्हां शेतकर्यांना न्याय देण्यात यावा.
भूसंपादन कायदा २०१३ नुसार बाजार भावाने व रेडीरेकनर हा बेस धरुन सदरच्या जमिनीच्या िंकमती खुपच कमी होत आहेत. कारण तीन वर्षाचे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरत असताना गेल्या तीन वर्षांचा कोरोनाकाळ होता. त्यामुळे सन २०२० ते २०२२ या तीन वर्षांत कोरोनामुळे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले नाहीत. तसेच रेडीरेकनरचे दर देखील कमी आहेत. त्यामुळे शेतकर्यांना मिळणारा मावेजा खूपच कमी मिळण्याची शक्यता असून ते शेतकर्यांवरती अन्याय आहे.
तरी शासन निर्णय क्र- संक्रीण-०३/२०१५/प्र.क्र. ३४/अ-२, दिनांक १२ मे, २०१५ अन्वये जिल्हाधिकारी व रेल्वे प्रशासन व वडगांव (सि.) येथील बाधीत शेतकर्यांची जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन शेतकर्यांच्या सहमतीने व वाटाघाटीने थेट खरेदी करण्यात यावी. सक्तीने भूसंपादन करण्यास आमचा तीव्र विरोध असून आम्ही एक इंचही जमीन संपादीत होऊ देणार नाही असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर वडगाव (सि.) येथील सुमारे ८५ शेतकर्यांच्या सह्या आहेत.