पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा , Guardian Minister Tanaji Sawant

0




पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा , Guardian Minister Tanaji Sawant

 

उस्मानाबाद,दि.9 ( osmanabadnews ):- पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजन समिती सभागृह जिल्हा नियोजन कार्यालय येथील नियोजन समिती सभागृहात यंत्रणांची आढावा सभा संपन्न झाली.

                 या सभेत पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी जिल्ह्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याबाबत,दहन-दफनभूमी घोषणापत्र चार झालेल्या गावांचा, डीएसडी डाटा साईन न झालेल्या सातबारा, ई-चावडी, ई-फेरफार तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घ्यावयाचे विविध प्रस्तावित कार्यक्रम,आरोग्य विभाग,नगरपालिका प्रशासन, सोलापूर,तुळजापूर,उस्मानाबाद रेल्वेमार्ग भूसंपादन,कृषी व जिल्हा वार्षिक योजना 2023-24 आणि महावितरणचा आढावा घेतला.

    यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे,जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.

               पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले,जिल्ह्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करणे व दहन व दफनभूमी प्रत्येक गावात उपलब्ध करुन देणे या मोहिमेला जिल्हा प्रशासनाने अत्यंत कुशलतेने हाताळून 80 टक्के शेतरस्ते मुक्त केले आहेत. उर्वरित प्रलंबित प्रकरणेही लवकर पूर्ण करावीत तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात दहन व दफनभूमी संबंधित समाजाच्या लोकसंख्येनुसार उपलब्ध करुन द्यावीत. वेगवेगळ्या समाजासाठी स्वतंत्र शेड त्याठिकाणी उपलब्ध करुन द्यावे.या कामाला अभियानाचे स्वरुप देऊन ही कामे पूर्ण करावी असेही निर्देश त्यांनी दिले.

              यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी शेत रस्त्यांच्या फलनिष्पत्तीबाबत व एकूण 665 पैकी 555 शेत रस्ते मोकळे केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे पालकमंत्र्यानी कौतूक केले. उर्वरीत शेत रस्तेही ऑगस्ट महिन्यात मोकळे करण्याचे निर्देश दिले.जिल्हा परिषद अंतर्गत 622 ग्रामपंचायतीमधील  दहन व दफन भूमीसाठी जागा उपलब्ध नसणाऱ्या गावांमध्ये सक्तीने भूसंपादनाची कार्यवाही करण्याबाबत सूचित केले.यासाठी जागा खरेदी व आवश्यक जन सुविधा (शेड व रस्ते)  यासाठी लागणार खर्च लवकर उपलब्ध करून देण्यात येईल.असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

           यावेळी घोषणापत्र 4 झालेला उस्मानाबाद महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असल्याने तसेच डीएसडी डाटा साईन न झालेल्या 7/12 अहवालामध्ये उस्मानाबाद जिल्हा मराठवाडा विभागात पहिला तर राज्यात दुसरा आल्याबद्दल पालकमंत्र्यानी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे कौतूक केले. 

         नगर परिषद परंडाच्या मुख्य अधिकारी यांना शहरातील रस्ते व नाल्याची कामे तात्काळ करून घेण्याबाबत पालकमंत्र्यानी निर्देश दिले.सोलापूर,तुळजापूर,उस्मानाबाद या रेल्वे लाईनच्या कामाबाबतची पालकमंत्र्यानी माहिती घेतली व प्रारूप निवाडे तयार करण्याबाबत सूचना केल्या.शेतकऱ्यांच्या तक्रारीचे वेळेवर निराकरण करण्याचे महावितरणाला निर्देश देताना पालकमंत्र्यानी महावितरण अधिकारी व एजन्सी

        यांचा दर आठवडयाला आढावा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.वाशी येथे 132 के.व्ही च्या सब स्टेशनसाठी पाठपुरावा करण्याबाबतही सूचना केली.

जिल्हयात एसटीच्या फेऱ्याबाबत परिवहन अधिकारी यांनी लक्ष देण्याचे व कमी उत्पन असलेल्या एस.टी बसना बंद नाकारण्याचे सांगितले.भुम तालुक्यातील इट येथे नवीन पोलीस स्टेशनसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस विभागाला तात्काळ अंदाजपत्रक देण्याचेही निर्देश दिले.तसेच घाट प्रिपी व पाचपिंपळा येथे पशु वैद्यकीय दवाखान्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास पशु संवर्धन विभागास निर्देश दिले.

                 जिल्हयातील बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे सांगताना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले,शेतकऱ्यांची  अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये.तसेच कर्ज देताना सिबील आणि वयाची कारणे देऊन कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅकांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.याची नोंद घ्यावी. असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हयात परवाना नसलेल्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे. त्यामूळे जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात आरटीओ ऑफिसने शिबीर घ्यावे व त्याबाबत योग्य ती प्रसिध्दी करून प्रत्येक वाहनधारकांना लायसन मिळेल यादृष्टीने काम करावे असे पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top