ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली प्रक्रिया राबविल्याबद्दल आरोग्य मंत्री प्रा.डॉ.सावंत यांचा वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे सत्कार

0
ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली प्रक्रिया राबविल्याबद्दल आरोग्य मंत्री प्रा.डॉ.सावंत यांचा वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे सत्कार

उस्मानाबाद -
सार्वजनिक आरोग्य विभागातील बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचा बुधवारी (दि.9) सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत हे बुधवारी उस्मानाबाद दौर्‍यावर आले असता महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने त्यांची भेट घेतली. यावेळी ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करून वैद्यकीय अधिकार्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांवर होत असलेल्या मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयाप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातही सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत, सातव्या वेतन आयोगानुसार 35 टक्के व्यवसायरोध भत्ता पूर्वलक्षीप्रमाणे लागू करावा, सेवेतील वैद्यकीय अधिकार्‍यांना एनपीए लागू करावा, सीपीएस पदविकाधारक वैद्यकीय अधिकार्‍यांना पदोन्नती देण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयांतील वैद्यकीय अधिकार्‍यांची संख्या 8 तास ड्युटीप्रमाणे वाढविण्यात यावी, कोविड काळात काम केल्याबाबत डीएमइआरप्रमाणे भत्ता किंवा वेतनवाढ वैद्यकीय अधिकार्‍यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या शाखेचे अध्यक्ष डॉ.महेश गुरव, सचिव डॉ.रोहित राठोड, डॉ.सचिन देशमुख, डॉ.सुशील चव्हाण, डॉ.मेंढेकर, डॉ.सुमित काकडे, डॉ.महेश गिरी, डॉ.महेश दळवे, डॉ.इंगळे, डॉ.घुले व इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top