उमरगा तालुक्यातील अनुसुचित जमाती व भटक्या विमुक्त जमाती लाभार्थ्यांसाठी विशेष शिबीर
उस्मानाबाद,दि.01( Osmanabad news ): उमरगा तालुक्यातील अनुसुचित जमाती आणि भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांची मतदान प्रक्रियेत मतदार नाव नोंदणी करणे,शिधापत्रिका वितरीत करणे व इतर अनुषंगिक सुविधा देण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर मोहिम हाती घेण्यात आली आहे.अनेक भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.जिल्ह्यातील भिल्ल,अंध, मसनजोगी,गारोडी,घिसाडी,कुडमुडे जोशी आदी (अनुसुचित जाती / भटक्या विमुक्त जमाती) त्यांच्याकडे 1950 पूर्वीचा कोणताही महसूली पुरावा नसल्यामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे.त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने भटक्या जमाती (भिल्ल,अंध,पारधी, मसनजोगी,गारोडी,घिसाडी,कुडमुडे जोशी आदी) जातीचे प्रमाणपत्र तसेच रेशनकार्ड,मतदान ओळखपत्र,संजय गांधी योजनेचा,आधारकार्ड व विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यास उमरगा तालुक्यात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
5 सप्टेंबर रोजी मुळज रोडवरील कोळीवाडा (चिंचोळे मंगल कार्यालय) येथे आणि 7 सप्टेंबर रोजी बिरुदेव मंदिर परिसर वस्ती येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तरी उमरगा तालुक्यातील अनुसुचित जमाती आणि भटक्या विमुक्त जमातीच्या लाभार्थ्यांनी या विशेष शिबीराचा लाभ घ्यावा.असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश पवार व तहसीलदार गोविंद येरमे यांनी केले आहे.